भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त राज्यातील 75 नद्यांचे पुनरुज्जीवन करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्यात येणार असून, या अंतर्गत जनजागरण करण्यासाठी नदी महोत्सव आयोजित करण्यात येणार आहे. महोत्सवाचा शुभारंभ येत्या 2 ऑक्टोबरपासून वर्धा येथे होणार असल्याची माहिती सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. या कार्यक्रमाच्या आढाव्यासाठी मंत्रालयात बैठक आयोजित करण्यात आली होती.
“राज्यातील ७५ नद्यांच्या पुनरुज्जीवन करताना जलबिरादरी यांच्या विशेष नैपुण्याची मदत घेतली जाणार आहे.देश विदेशात जलतज्ञ म्हणून परिचित असलेले डॉ. राजेंद्र सिंह यांची मदत यासाठी घेतली जाणार असून, राज्य शासनाचे जलसंपदा, जलसंधारण, वन इत्यादी विभाग यामध्ये जोडले जाणार आहेत. नदी संरक्षण आणि संवर्धनसाठी सांस्कृतिक कार्य विभाग काम करणार असून सांस्कृतिक कार्य विभागामार्फत महाराष्ट्रातील ७५ नद्यांसाठी प्रत्येक जिल्हयातील एका नोडल ऑफीसर यांची नियुक्ती केली जाणार आहे”, असे सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटले.
“हे नोडल ऑफीसर संबंधित नदीच्या विकासासाठी, पुनरुज्जीवनासाठी काम करतील. आओ नदी को जानें याचा मराठी अनुवाद लवकरच तयार करण्यात यावा असेही निर्देश त्यांनी यावेळी दिले. ७५ नदी यात्रेच्या माध्यमातून नद्यांचे आयुष्य चांगले कसे राहील,नदी ही अमृतवाहिनी कशी आहे. छोटया नद्या पुनरुज्जीवीत केल्या तर त्याचा कसा फायदा होईल यासर्वांची माहिती नदी यात्रेच्या दरम्यान देण्यात येईल”, असेही सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटले.