शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत (आरटीई) राज्यातील सर्व शाळांमधील इयत्ता पहिलीच्या दुर्बल आणि वंचित घटकांसाठी राखीव ठेवण्यात आलेल्या 25 टक्के प्रवेश गेल्या दोन दिवसांपासून तांत्रिक कारणाने सुरू होऊ शकला नाही. मात्र गुरूवारपासून राखीव प्रवेशासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरळीत झाली आहे. तिसऱ्या दिवशी राज्यभरातून 39 हजार 163 विद्यार्थ्यांनी ऑनलाइन अर्ज केले आहेत.
पुणे जिल्ह्यातील आरटीई प्रवेशाच्या जागा गुरूवारी संकेतस्थळावर जाहीर करण्यात आल्या. त्यामध्ये पुण्यातील 963 शाळांमध्ये 16 हजार 619 जागा यंदा प्रवेशासाठी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. मागील वर्षीच्या तुलनेत 326 जागांची वाढ झाली आहे. आरटीई प्रवेशासाठी ऑनलाइन अर्ज भरण्यास मंगळवारपासून सुरूवात झाली. मात्र प्रत्यक्षात पहिले दोन दिवस प्रवेश अर्ज भरता आले नव्हते. त्यामुळे पालकांकडून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली होती.
आरटीई प्रवेशासाठी संकेतस्थळावर मदत केंद्रांचे मोबाइल क्रमांक उपलब्ध करून देण्यात आले आहेत. पालकांना अर्ज भरण्यासाठी संकेतस्थळावरून ऍप डाऊनलोड करून घेता येणार आहे. मात्र अजूनही ऍपवरून अर्ज भरणाऱ्यांची संख्या खूप अल्प आहे. आतापर्यंत केवळ 60 अर्ज मोबाइल ऍपवरून भरले गेले आहेत. उर्वरित अर्ज संकेतस्थळावरून पालकांनी भरल्याची माहिती शिक्षण विभागाकडून देण्यात आली.