Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

सामना अग्रलेखातून शिवसेनेने केले नरेंद्र मोदींचे कौतुक

saamana editorial
, गुरूवार, 22 ऑक्टोबर 2020 (08:27 IST)
पंतप्रधान मोदी यांनी मंगळवारी राष्ट्राला उद्देशून केलेल्या संबोधनात देशवासीयांना काय दिले? त्यांच्या भाषणात नवीन काय? त्यांनी महाराष्ट्राच्या पूरग्रस्तांना काय दिलासा दिला? कोणते आर्थिक पॅकेज जाहीर केले? असा टीकेचा सूर निघू शकेल. तरीही मोदींचे भाषण छोटेखानी, पण प्रभावी होते. त्यात ‘डिसलाइक’ करण्यासारखे काहीच नव्हते. देशांतर्गत खऱ्या संकटाची त्यांनी जाणीव करून दिली. त्यांनी कोरोनासंदर्भात सत्य तेच सांगितले. हीच त्यांच्या अध्यात्माची ताकद. ते आले, ते बोलले. शुभ्र दाढी, तेजस्वी चेहरा. या तेजानेच देशातील संकटांचा अंधार दूर होईल. भारतीय जनता पक्षाची हीच भावना असेल तर आमच्या त्यांना शुभेच्छा आहेत अशा शब्दात सामना अग्रलेखातून शिवसेनेनं नरेंद्र मोदींचं कौतुक केलं आहे.
 
मोदी यांनी फक्त सात-आठ मिनिटांचे कोरोनासंदर्भात जे प्रबोधन केले ते गेल्या सात-आठ महिन्यांतील उत्तम संबोधन होते. लॉक डाऊन संपलाय, पण कोरोना संपलेला नाही. देश अजूनही कोरोनाशी लढतोय. ही माणूस जगविण्याची, मानवतेची लढाई असल्याचे त्यांनी सौम्य शब्दांत सांगितले. मोदी यांचा चेहरामोहरा अलीकडच्या काळात बदलला आहे. त्यांची दाढी अधिक शुभ्र व छातीपर्यंत वाढली आहे. त्यांच्या चेहऱ्यावरही वेगळे तेज दिसत आहे. एक तर ते अध्यात्माच्या मार्गाने निघाले आहेत किंवा त्यांनी एखाद्या दीर्घ तपस्येची पूर्वतयारी सुरू केलेली दिसते. मोदींचे भाषण हे पंतप्रधानांचे नव्हते तर एका चिंताग्रस्त पालकाचे होते. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून मराठी भाषेत जे संबोधन उद्धव ठाकरे करतात त्याच पद्धतीचे राष्ट्रीय संबोधन मोदी यांनी दिल्लीत बसून हिंदीतून केले. पण मुख्यमंत्र्यांच्या भाषणास नाके मुरडणाऱ्यांनी मोदींच्या भाषणास दाद दिली आहे असं सांगत शिवसेनेनं भाजपा नेत्यांना लगावला आहे.
 
सामना अग्रलेखातील महत्त्वाचे मुद्दे
पंतप्रधान मोदी यांची स्वतःची एक कार्यपद्धती आहे. त्या कार्यपद्धतीवर कितीही टीका झाली तरी ते त्यांची पद्धत बदलत नाहीत, हे त्यांच्या मंगळवारच्या राष्ट्रीय संबोधनाने स्पष्ट झाले. मोदी राष्ट्राला उद्देशून मंगळवारी संबोधन करणार आहेत, असे जाहीर केल्यापासून अनेकांच्या झोपाच उडाल्या होत्या तर कित्येक जण आस लावून टीव्हीसमोर बसले होते. पण यापैकी काहीच घडले नाही.
 
मोदींनी कुणाला धक्काही दिला नाही व कुणास तूपलोणीही फासले नाही. मोदी यांनी एक मोजके व आटोपशीर संबोधन केले. त्यांनी देशातील कोरोनाचा धोका कायम असल्याचे सांगितले. लोकांनी अजिबात ढिलाई करू नये, असा इशाराच वडिलकीच्या नात्याने दिला.
 
मोदी यांनी लोकांना सांगितले आहे, ‘हात साबणाने स्वच्छ धूत जा. तोंडाला मास्क लावल्याशिवाय बाहेर पडू नका. दोन फुटांचे सुरक्षित अंतर एकमेकांत ठेवा.’ पंतप्रधानांनी हे सर्व पालकत्वाच्या नात्याने सांगितले व लोकांनी त्यांचे ऐकायला हवे. अत्यंत कठीण परिस्थितीतून आपण सगळे जात आहोत. एक छोटीशी चूक आपला आनंद मारू शकते.
 
मी आपल्या सगळ्यांना सुरक्षित व आनंदी पाहू इच्छितो. जीवनात कर्तव्यपालन करताना सावधानता बाळगली तरच जीवनात ‘खुशी’ची बहर कायम राहते, असा लाखमोलाचा संदेश मोदींनी दिला व तो बरोबर आहे. मोदी यांचे भाषण लोकांना आवडणार नाही व सोशल मीडियावर ‘डिसलाइक’चा पाऊस पडेल, असे भय वाटल्याने ‘डिसलाइक’चे बटनच ‘ब्लॉक’ केले. पण तसे करण्याची गरज नव्हती.
 
मोदींचे 10-12 मिनिटांचे भाषण माहितीपूर्ण होते. मोदी यांचे राष्ट्रीय संबोधन महाराष्ट्राच्या राज्यपालांनी काळजीपूर्वक ऐकले असेलच. लोक गर्दी करतील अशी ठिकाणे इतक्यात उघडता येणार नाहीत. कारण लोक बेजबाबदारपणे वागत आहेत. हे देशाचे पंतप्रधान सांगतात. तेव्हा त्याचा विचार करायला हवा. थोडीशी लापरवाही जीवनाची गती थांबवू शकते, इतका स्पष्ट संदेश पंतप्रधानांनी दिला आहे.
 
बाजारात हळूहळू उलाढाल वाढत आहे. आर्थिक उलाढालीत तेजी येत असल्याची माहिती मोदींनी दिली. ही गती जास्त कशी वाढेल? कोरोनामुळे जो बेरोजगारीचा भस्मासुर उसळला आहे त्यास कसा अटकाव करणार? यावर पंतप्रधान भूमिका मांडतील, असे वाटले होते. पण मोदींनी चकवा दिला.
 
देशात रिकव्हरी रेट वाढतो आहे. मृत्यूदर कमी झाला आहे. दुनियेतील साधनसंपन्न देशांच्या तुलनेत आपण जास्तीत जास्त नागरिकांचे प्राण वाचविण्यात यशस्वी झाल्याचे मोदी यांनी सांगितले. आमच्या देशात प्रतिलाख साडेपाच हजार लोक कोरोनाग्रस्त आहेत. अमेरिकेत हे प्रमाण 25 हजारांवर आहे. हे खरे असले तरी अमेरिकेत कोरोना कारणाने जे लोक बेकार झाले आहेत, त्यांच्या बँक खात्यांवर ट्रम्प सरकार जगण्यासाठी भत्ता जमा करीत आहे, हेसुद्धा तितकेच खरे.
 
कोरोनावरील लसीचे संशोधन सुरू आहे. सर्व नागरिकांपर्यंत लस पोहोचविण्यासाठी सरकार शर्थ करेल, असे सांगून पंतप्रधान मोदी यांनी नवरात्र, दसरा, ईद, दीपावली, छटपूजा व गुरूनानक पर्व आदी सर्वधर्मीय सणांसाठी देशवासीयांना शुभेच्छा दिल्या. याचा स्पष्ट संदेश असाच आहे की, आपले पंतप्रधान घटनेनुसार ‘सेक्युलर’च आहेत आणि याची नोंद आपल्या राज्यपालांनी घेणे गरजेचे आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

काय म्हणता, पुणेकरांना अवघ्या ५ रुपयात प्रवास करता येणार