सर्वोच्च न्यायालयाने मराठा समाजाला शैक्षणिक आणि नोकऱ्यांमध्ये आरक्षण देणारा कायदा रद्द केल्याने महाराष्ट्रातील राजकारण तापलं. सत्ताधारी महाविकास आघाडीतील तिन्ही पक्ष यावरून भाजपाला धारेवर धरताना दिसत आहेत. तर भाजपाकडून महाविकास आघाडीला जबाबदार धरलं जात आहे. या वादात आता खासदार छत्रपती संभाजीराजे यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भेटीसाठी वेळ न दिल्याच्या मुद्द्याची भर पडली आहे. यावरून आता राजकीय खडाजंगी होताना दिसत आहे. भाजपा प्रदेशाध्यक्ष यांनी याबाबत दिलेल्या स्पष्टीकरणानंतर काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी भाजपावर टीका केली होती. त्यांच्या टीकेला आता विधान परिषद विरोधी पक्षनते प्रविण दरेकर यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
“उतावळा नवरा, गुडघ्याला बाशिंग”, अशी गत सध्या सचिन सावंत यांची झाली असून, कसलीही माहिती न घेता, ते मत ठोकून देतात! मराठा आरक्षण व छत्रपतींचा सन्मान कसा करतात हे भाजपाला शिकवू नका! आरक्षण वाचवणं जमलं नाही, आता किमान सर्वोच्च न्यायालयात फेरविचार याचिका तरी दाखल करा!” असं प्रविण दरेकरांनी ट्विटद्वार म्हटलं आहे.