मनमाड :- ग्रामस्थांनी एखादी गोष्ट ठरवली आणि मनापासून केली तर अशक्य ते शक्य होते. याची प्रचिती मनमाड शहरापासून जवळच असलेल्या वंजारवाडी, तालुका नांदगाव येथे आली.
गावातील १४ वर्ष वयाचा सम्या हा मतिमंद मुलगा अचानक हरवला आणि सर्व संपूर्ण गावाला त्याची चिंता वाटू लागली. मग ग्रामस्थांनीही आपापल्या परीने सोशल मीडियाचा आधार घेत शोधमोहीम सुरू केली आणि या प्रयत्नांना यश आले. बेपत्ता झालेला सम्या नाशिक येथे मिळून आला आणि ग्रामस्थांचा जीव भांड्यात पडला आणि सर्वानी सुटकेचा विश्वास घेत सम्या सापडल्याबद्दल गावात जल्लोष केला.
याबाबतची माहिती अशी की, वंजारवाडी येथील अरुण शरद खैरनार उर्फ सम्या (वय १४) हा अचानक बेपत्ता झाला. ग्रामस्थांनी त्याचा बराच शोध घेतला पण तो मिळून आला नाही. अखेर मनमाड शहर पोलीस ठाण्यात याबाबत रीतसर नोंद करण्यात आली. ग्रामस्थांनीही आपल्या परीने शोध सुरू केला.
प्रत्येकाने त्याचा फोटो असलेला स्टेटस आपल्या मोबाईलवर ठेवला सम्या उर्फ अरुण हा मतिमंद आहे, तो स्वतःचे नाव देखील सांगू शकत नसल्याने ग्रामस्थांची चिंता वाढू लागली. तो अत्यंत गरीब परिवारातील आहे. आई वडील काबाडकष्ट करून आपला उदरनिर्वाह चालवतात. त्यामुळे संपूर्ण गावाला चिंता वाटू लागली. आठ दिवस उलटून गेले तरी देखील त्याचा शोध लागू शकला नाही, पण ग्रामस्थांनी आपले प्रयत्न सुरूच ठेवले.
वंजारवाडीतील एक कर्मचारी संदीप अहिरे हे कामासाठी नाशिकला आले असताना नाशिक रोड रेल्वे स्टेशनवर आले. तेव्हा रेल्वे स्थानकात त्यांची नजर सम्यावर पडली. त्यांनी तत्काळ त्याला जवळ घेतले आणि वंजारवाडी गावात फोन करून सम्या सापडल्याची माहिती दिली. हे वृत्त गावात पसरतात संपूर्ण गावात आनंद पसरला. सम्याचे गावात आगमन होताच गावकऱ्यांनी डीजे लावून एकच जल्लोष केला. बेपत्ता सम्या सापडल्याने गावात आनंदोत्सव साजरा करण्यात आला.
Edited by : Ratnadeep Ranshoor