पत्राचाळ आर्थिक गैरव्यवहार प्रकरणामध्ये सध्या न्यायालयीन कोठडीमध्ये असलेले शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना ईडीने पुन्हा मोठा झटका दिला आहे. संजय राऊत यांना ईडीने जामीन देण्यास विरोध केला आहे. मुंबई सत्र न्यायालयाच्या विशेष पीएमएलए कोर्टात ईडीने उत्तर दाखल केले आहे.
ईडी तपास सुरू ठेवू शकते, परंतु आपल्याला तुरुंगात ठेवल्याने काहीही निष्पन्न होणार नाही, असा दावा राऊत यांनी विशेष न्यायालयामध्ये केला होता. राऊत यांच्या वकिलाने त्यांचा जामीन अर्ज विशेष न्यायालयामध्ये सादर केला होता. तसेच त्यावर तातडीने सुनावणी घेण्याची मागणी देखील करण्यात आली होती. परंतु, पुढील आठवड्यातील व्यस्त कार्यामुळे जामीन अर्जावर तातडीने सुनावणी होणार नाही, असे विशेष न्या. एम. जी. देशपांडे यांनी स्पष्ट सांगितले होते.
त्यावर ईडीच्यावतीने ॲड. कविता पाटील यांनी भूमिका स्पष्ट करण्यासाठी अवधी मागितला होता. त्यानंतर न्यायालयाने ईडीला राऊत यांच्या जामीन अर्जावर १६ सप्टेंबरपर्यंत उत्तर दाखल करण्याचे आदेश दिले होते.