Nashik News संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांच्या पौषवारी यात्रेला मोठया उत्साहात नाशिक मधील त्र्यंबकेश्वर येथे सुरुवात झाली आहे. हरिनामाचा जयघोष तसेच टाळ मृदुंगाच्या गजरात त्र्यंबकनगरी दुमदुमली.
नशिकमधील त्र्यंबकेश्वर मध्ये संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांच्या पौषवारी यात्रेला सुरुवात झाली आहे. त्यामुळे त्र्यंबकेश्वर नगरी दुमदुमली आहे. हरिनामाचा जयघोष,टाळ मृदुंगाचा गजर सर्वत्र केला जात असुन वारकऱ्यांमध्ये प्रचंड उत्साह पहायला मिळत आहे निवृत्तीनाथ मंदिर परिसरात दोन किमी पर्यंत रांगा लागल्या आहेत. पहाटे नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भूसे यांनी संत निवृत्तीनाथ महाराज समाधीची महापूजा केली. महापूजा झाल्यानंतर संत निवृत्तीनाथ संजीवन समाधी मंदिरात आलेल्या दिंडीला मुख दर्शनासाठी आत सोडण्यात येत आहे. यावर्षी इतर राज्यातील दिंड्यांची संख्या लक्षणीय आहे. दर्शनवारी अहोरात्र सुरु आहे तसेच दिंडीतील विणेकरी भक्तांचा सन्मान करण्यात येत आहे. रविवारी दुपारी अंजेनरीजवळील ब्रम्हा व्हॅली महाविद्यालयात श्री क्षेत्र जायखेडयाच्या हजारो वारकऱ्यांचा शिस्तबद्ध आणि नयनरम्य, असा भव्य दिव्य रिंगणसोहळा पार पडला.
वारकऱ्यांच्या पायाची आयुर्वेदिक मसाज- आठहजार वारकर्यांच्या पायाची आयुर्वेदिक मसाज केली जात आहे लोकनेते शंकरराव बालाजी वाजे पतसंस्थेच्या फिरत्या दवाखान्याद्वारे संत निवृत्तीनाथ यात्रेसाठी जाणाऱ्या दिंड्यातील वारकऱ्यांवर मोफत उपचार सुरु आहेत. चार दिवसांत पाय सुजलेल्या आठ हजार वारकऱ्यांच्या पायाची मसाज करून देण्यात आली तसेच दहा हजार वारकऱ्यांवर मोफत औषध उपचार करण्यात आले व गंभीर आजार आढळून आलेल्या 150 जणांना सरकारी दवाखान्यात पाठवण्यात आले.
पोलिसांचा बंदोबस्त- नाशिक मधील त्र्यंबकेश्वर मध्ये यंदाच्या होणाऱ्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनकडून चोख बंदोबस्त करण्यात येणार आहे. यामध्ये 2 डीवायएसपी, 6 पीआय, 21 पुरुष पीएसआय, 4 महिला अधिकारी, 210 पोलीस अमलदार पुरुष आणि 60 महिला व पुरुष अमलदार यांचा समावेश आहे यामुळे यंदाच्या यात्रेसाठी पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात आहे.
सीसीटीव्ही लावण्यात आले- त्र्यंबकेश्वर मध्ये यात्रेसाठी राज्याच्या सर्व बाजूंनी भाविक येत असल्याने मोठी गर्दी होत आहे तर या गर्दीचा फायदा घेत चोरट्यांना संधी साधता येते व लहान मुले देखील गर्दित हरवत असतात. यासाठी त्र्यंबक नगरपरिषदेने चोख व्यवस्था केली असून ठिकठिकाणी सीसीटीव्ही लावण्यात आले आहे.