फेसबुक, व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून प्रेमाच्या जाळ्यात ओढून लुबाडणाऱ्या तिघांना सातारा पोलिसांनी अटक केली आहे. अटक करण्यात आलेले तिघेजण बारामती तालुक्यातील करावागज येथील असून यामध्ये एका तरुणीचा समावेश आहे. या टोळीने साताऱ्यात एकाला लुटले होते. याप्रकरणी सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सोशल मीडीयाच्या माध्यमातून प्रेमाच्या जाळ्यात ओढत लुटमारीचे प्रकार पुणे जिल्ह्यात घडले होते. अशाच पद्धतीने डिसेंबर 2020 मध्ये साताऱ्यातील एकास ठोसेघर परिसरात बोलावून लुटण्यात आले होते. या गुन्ह्याचा तपास करत असताना पोलिसांच्या पथकाने बारामती तालुक्यात आरोपींचा शोध घेतला. त्यावेळी आरोपी करावागज येथे असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार वैभव प्रकाश नाळे (वय-28), अजिंक्य रावसाहेब नाळे (वय-28 दोघे रा. करावागज ता. बारामती) यांना अटक करण्यात आली. तर थेऊर परिसरातून 28 वर्षीय युवतीला ताब्यात घेण्यात आले.
अटक करण्यात आलेल्या आरोपींकडे केलेल्या चौकशीत त्यांनी सातारा तालुक्यातील ठोसेघर येथे मागील वर्षी डिसेंबरमध्ये एकाला बोलावून त्याच्याकडील सोने, चारचाकी, रोकड लुटल्याचे कबुल केले. तसेच त्याचे फोटो व व्हिडीओ काढून ते व्हायरल करण्याची धमकी देत मारहाण केल्याचे पोलिसांना सांगितले. चौकशीत त्यांची महिला साथिदाराचे नाव सांगितले. त्यानुसार पोलिसांनी हवेली तालुक्यातील थेउर येथून युवतीला ताब्यात घेतले.