Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मालेगावमध्ये स्वतंत्र पोलीस आयुक्तालय होणार का? पहा काय झाले अधिवेशनात वाचा पूर्ण रिपोर्ट

मालेगावमध्ये स्वतंत्र पोलीस आयुक्तालय होणार का? पहा काय झाले अधिवेशनात वाचा पूर्ण रिपोर्ट
, गुरूवार, 21 डिसेंबर 2023 (17:22 IST)
मालेगाव येथे स्वतंत्र पोलीस आयुक्तालयासाठी गेल्या कित्येक वर्षांपासूनच्या प्रलंबित मागणीला उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मक प्रतिसाद देत लवकरच मालेगावला पोलीस आयुक्तालय अस्तित्वात येणार असल्याचे आश्वासन दिले. मालेगाव अनेकदा वादाच्या भोवऱ्यात अडकले असून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो .
 
आयुक्तालय हे शहराच्या कायदा व सुव्यवस्थेसाठी अत्यंत गरजेचे असल्याचे मानले जाते, त्यामुळे या निर्णयामुळे शहरवासीयांनी समाधान व्यक्त केले आहे.  नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालयातून विभाजित करून मालेगाव येथे स्वतंत्र पोलीस आयुक्तालयाची निर्मिती करण्यात यावी, यासाठी 2018 मध्येच तत्कालीन पोलीस अधीक्षक संजय दराडे यांनी पोलीस महासंचालकांना प्रस्ताव दिला आहे. त्याआधीपासूनच मालेगाव पोलीस आयुक्तालयाची मागणी प्रलंबित आहे.
 
याच अनुषंगाने लोकप्रतिनिधींनी काल नागपूर येथे अधिवेशनादरम्यान उपमुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेत कायदा व सुव्यवस्थेसाठी मालेगावला पोलीस आयुक्तालय स्थापन करण्याची मागणी केली. त्यावर गृहमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत लवकरच स्वतंत्र मालेगाव पोलीस आयुक्तालय अस्तित्वात येईल, असे आश्वासन दिले आहे. 2018 मध्ये दिलेल्या प्रस्तावानुसार 1947 ते 2006 पर्यंत गंभीरस्वरूपाच्या 25 दंगली झालेल्या आहेत. सप्टेंबर 2006 मध्ये बाँबस्फोटाची घटना घडली होती. याशिवाय जातीय स्वरूपाच्या लहानसहान घटना सातत्याने घडत असतात. 2011 च्या जनगणनेनुसार पाच लाख 90 हजार, तर आजमितीस सुमारे दहा ते 12 लाख लोकसंख्या शहराची आहे.
 
शहराचा वाढता विस्तार व शहरीकरणामुळे दिवसेंदिवस कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर होतो आहे. यासाठी मालेगावात स्वतंत्र पोलीस आयुक्तालय गरजेचे आहे. नोव्हेंबर महिन्यात नाशिक ग्रामीणचे पोलिस अधीक्षक शहाजी उमाप यांनीही हा प्रस्ताव पोलीस महासंचालकांना सादर केला. तोच प्रस्ताव गृहविभागाच्या अपर सचिवांनाही देण्यात आला आहे.
 
पोलीस आयुक्त तथा पोलीस उपमहानिरीक्षक- एक, पोलीस उपायुक्त- तीन, सहाय्यक पोलीस आयुक्त- सात, पोलीस निरीक्षक- 32, सहाय्यक निरीक्षक- 32, उपनिरीक्षक- 67, सहाय्यक उपनिरीक्षक- 166, हवालदार- 237, पोलीस नाईक- 260, पोलीस शिपाई- 688 आदींसह सुमारे एकूण एक हजार 764 कर्मचारी असणार आहे. मालेगाव शहर, आझादनगर, आयशानगर, पवारवाडी, रमजानपुरा, सायने, सौंदाणे, मालेगाव छावणी, मालेगाव कॅम्प, मालेगाव किल्ला, मनमाड चौफुली, मालेगाव तालुका, सोयगाव, द्याने या पोलीस ठाण्यांचा समावेश आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

भावाला किडनी दिल्यामुळे पतीने सौदी अरेबियातून फोनवर दिला तिहेरी तलाक