Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
मंगलवार, 15 अक्टूबर 2024
webdunia

१६ जानेवारीला हल्लाबोल आंदोलनाचा दुसरा टप्पा मराठवाड्यापासून सुरू

१६ जानेवारीला हल्लाबोल आंदोलनाचा दुसरा टप्पा मराठवाड्यापासून सुरू
, शनिवार, 6 जानेवारी 2018 (17:05 IST)

३१ जानेवारीला खा. शरद पवार यांच्या उपस्थितीत होणार समारोप

राज्यात शेतकऱ्यांचे प्रश्न आजही अनुत्तरित आहेत. कर्जमाफीचा मुद्दा आजही प्रलंबित आहे. या मुद्द्यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने १ डिसेंबर ते १२ डिसेंबरपर्यंत हल्लाबोल आंदोलन केले. लोकांचा आंदोलनाला उदंड पाठिंबा मिळाला. झोपी गेलेले सरकार जागी झाले आणि सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफीच्या रकमा देण्यास सुरुवात केली. बोंडअळी, ओखी वादळ, तुडतुड्या यासाठी सरकारने मदतीची घोषणा केली मात्र अद्याप त्याची अंमलबजावणी केली नाही. रोजगार निर्मिती झाली नाही, राज्यात विकास घडत नाही याचा निषेध म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने हल्लाबोल आंदोलनाचा दुसरा टप्पा मराठवाड्यापासून सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे, अशी घोषणा आज राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे  यांनी पत्रकार परिषदेत केली. १६ जानेवारीला मराठवाड्यात या आंदोलनाला सुरुवात होईल. मराठवाड्याच्या आठही जिल्ह्यात हे आंदोलन केले जाणार आहे. ३१ जानेवारीला औरंगाबाद येथे या आंदोलनाचा राष्ट्रीय अध्यक्ष खा. शरद पवार यांच्या उपस्थितीत समारोप होईल. शेतकऱ्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सतत संघर्ष करणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी मुख्य प्रवक्ते नवाब मलिक  हेही उपस्थित होते.

नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच भीमा-कोरेगावची दुर्दैवी घटना घडली, याबाबत तटकरे यांनी खेद व्यक्त केला. काही जातीयवादी लोकांनी जाणीवपूर्वक तणावपूर्ण वातावरण निर्माण कररून हे कारस्थान केले आहे. सरकारने या प्रकरणाच्या मुळाशी जाणे अपेक्षित होते. परंतु सरकार हे प्रकरण हाताळण्यात अपयशी ठरले आहे. तरी परिस्थिती पूर्वपदावर आणण्यासाठी सरकारने प्रयत्न केले पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले. ते पुढे म्हणाले की जनतेला विनंती करतो की परस्परातील सामंजस्य आणि महाराष्ट्रातील शांतता राखण्यासाठी त्यांनी सहकार्य करावे.

मुख्यमंत्र्यांच्या चाहत्यांनी 'देवेंद्र फडणवीस फॉर महाराष्ट्र' या फेसबुक पेजवर खा. शरद पवार  यांच्या बद्दल आक्षेपार्ह पोस्ट आणि कमेंट टाकल्या आहेत. पवार साहेब हे एक उत्तुंग व्यक्तिमत्त्व आहेत. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर त्यांची ख्याती आहे. आदरणीय पवार साहेबांवर अशी खालच्या पातळीवर टीका करणे हा राज्याचा आणि देशाचा अपमान आहे, असे तटकरे म्हणाले. मुख्यमंत्र्यांनी याची नोंद घेतली पाहिजे. सरकारने अशा लोकांवर कारवाई केली पाहिजे. सरकारने याबाबत ठोस पाऊले उचलायला हवीत, अशी मागणी त्यांनी केली.


Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

पतंगाची 'उडाण'; विद्युत सुरक्षेबाबत सावधान