Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

शरद पवार: लोकांच्या आग्रहास्तव सुप्रिया सुळेंना कार्याध्यक्षपद दिलं

Webdunia
शनिवार, 10 जून 2023 (19:39 IST)
राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे आणि माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आलीय.
 
राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी याबाबत दिल्लीत घोषणा केली. दिल्लीत राष्ट्रवादीच्या 25 व्या वर्धापनदिनानिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
 
या कार्यक्रमात शरद पवारांनी आपल्या भाषणात सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेलांच्या नावाची कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्तीची घोषणा केली.
 
"लोकांच्या आग्रहास्तव सुप्रिया सुळेंना कार्याध्यक्षपद दिलं. आम्ही पक्षातल्या नेत्यांना जबाबदारी देण्याचा निर्णय घेतला. पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी हा निर्णय महत्त्वाचा आहे. निवडणुकांच्या काळात आम्ही इतर पक्षांशी चर्चा करुन त्यांच्याबरोबर जाण्याच्या विचारात आहोत. येत्या काळात आम्ही सर्व पक्षांशी चर्चा करत आहोत. भाजपाविरोधात एकच उमेदवार विरोधी पक्षांतर्फे देण्यात येण्याच्या दृष्टिने विचार केला जाणार आहे. लोकांना परिवर्तन हवं आहे. त्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्याच्या दृष्टिने प्रयत्न करण्याची इच्छा आहे", असं पवार म्हणाले.
 
कार्याध्यक्ष नेमण्याची मागणी होत होती. माझी राजीनाम्याची मागणी मान्य झाली नाही. लोकांच्या आग्रहास्तव सुप्रिया सुळेंना कार्याध्यक्षपद दिलं असं पवार यांनी सांगितलं.
 
पवार पुढे म्हणाले, "अध्यक्षपदाची जागा रिक्त झाल्यावर अध्यक्षपदाबद्दल ठरवता येईल. अजित पवार यांच्यावर विधानसभेत विरोधीपक्षनेतेपदाची जबाबदारी आहे, जयंत पाटलांकडे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी आहे. मात्र सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल यांच्याकडे वेगळी जबाबदारी नव्हती. त्यामुळे कोणीही नाराज वगैरे होण्याचा प्रश्न उरत नाही. अजित पवार नाराज नाहीत".
 
"महाराष्ट्राची जनता शिंदे-भाजपा सरकारला धडा शिकवेल. राज्यात सुरू असलेला धार्मिक वाद लोक स्वीकारणार नाहीत. भाजपाने कर्नाटकात हनुमानांच्या नावाने राजकारण केले पण ते लोकांनी स्वीकारले नाही. बिगरभाजपा शक्ती एकत्र कशा येतील याकडे आमचे लक्ष आहे. ती प्रक्रिया सुरू आहे", असं पवार म्हणाले.
 
छगन भुजबळ एबीपी माझाशी बोलताना म्हणाले की, "खरं सांगायचं तर सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल यांच्यावर जबाबदारी देणार असल्याची मला कल्पना होती. निवडणुका जवळ येत आहेत, अशावेळी जबाबदारी देणं आवश्यक होतंच. कामाचं वाटप करण्यात आलंय."
 
विश्वास सार्थ ठरवेन - सुप्रिया सुळे
सुप्रिया सुळे यांची निवड झाल्यानंतर त्यांनी ट्विटरवरून पहिली प्रतिक्रिया दिलीय.
 
सुप्रिया सुळे म्हणाल्या की, "राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात माझी व प्रफुलभाई पटेल यांची कार्यकारी अध्यक्षपदी निवड करण्यात आली. याबद्दल पक्षसंघटनेची मी मनापासून आभारी आहे. पक्षाने माझ्यावर टाकलेला हा विश्वास सार्थ ठरविण्यासाठी मी कटिबद्ध आहे."
 
तसंच, सुप्रिया सुळे पुढे म्हणाल्या की, "राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि हितचिंतक यांचे यापूर्वी उत्तम सहकार्य मिळाले आहे ते यापुढेही कायम राहिल हा विश्वास आहे. या जबाबदारी बद्दल आदरणीय पवार साहेब, पदाधिकारी, ज्येष्ठ नेते आणि कार्यकर्ते आदी सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून आभार."
विधापसभेतील विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे दिग्गज नेते अजित पवार यांना या माध्यमातून पक्षाने डावललं आहे, अशी चर्चा माध्यमांमध्ये दिसून येते.
 
गेल्या महिन्यातील शरद पवार यांच्या राजीनामा नाट्यादरम्यान अजित पवार यांच्या भूमिकेने लक्ष वेधून घेतलं होतं. त्यामुळे सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल यांना कार्याध्यक्ष करण्यात आल्यानंतर त्यांची प्रतिक्रिया काय असेल, हा प्रश्न होता.
 
एका ठिकाणी कार्यक्रमात अजित पवार यांना प्रसारमाध्यमांकडून प्रत्यक्ष प्रश्न विचारण्यात आला. त्याला अजित पवार यांनी नो कमेंट म्हणत उत्तर देणं टाळलं.
पण सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल यांच्या निवडीवर त्यांनी ट्वीट करून आपली प्रतिक्रिया दिली आहे.
 
ते म्हणाले, "राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या 24 व्या वर्धापन दिनी आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली खासदार प्रफुल्लभाई पटेल आणि खासदार सुप्रियाताई सुळे यांची पक्षाच्या कार्यकारी अध्यक्षपदी निवड करण्यात आली. तसंच खासदार प्रफुल्लभाई पटेल, खासदार सुप्रियाताई सुळे, खासदार सुनिल तटकरे, डॉ. योगनानंद शास्त्री, के.के. शर्मा, पी.पी. महोम्मद फैजल, नरेंद्र वर्मा, जितेंद्र आव्हाड, एस. आर. कोहली, नसीम सिद्दकी या सहकाऱ्यांना पक्षांतर्गत विविध महत्त्वाच्या जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत. या सर्व सहकाऱ्यांचे मन:पूर्वक अभिनंदन! आदरणीय साहेबांनी टाकलेला विश्वास सार्थ ठरवत दिलेल्या जबाबदाऱ्या सर्व सहकारी यशस्वीपणे पार पाडतील, असा विश्वास आहे."
 
"आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांच्या नेतृत्व आणि मार्गदर्शनाखाली 'हृदयात महाराष्ट्र… नजरे समोर राष्ट्र…' हा विचार घेऊन रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण करणारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष देशाच्या आणि राज्याच्या जडण-घडणीत मोलाचं योगदान देईल. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्ता, पदाधिकारी याच ध्येयानं कामं करतील हा विश्वास आहे. नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचं पुन:श्च अभिनंदन!"
 
पवारांचा आधी राजीनामा, मग माघार
2 मे 2023 रोजी शरद पवार यांच्या 'लोक माझे सांगाती' या राजकीय आत्मचरित्राची सुधारित आवृत्ती प्रकाशित झाली. या प्रकाशन सोहळ्यात शरद पवारांनी राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदावरून निवृत्ती जाहीर केली होती. त्यानंतर कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांनी विरोध केल्यानं निवृत्तीचा निर्णय मागे घेतला.
 
मात्र, 2 मे रोजीच्या कार्यक्रमात बोलताना शरद पवार म्हणाले होते की, "मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला आहे. तथापि शिक्षण, शेती, सहकार, क्रीडा, सांस्कृतिक क्षेत्रात अधिक काम करण्याचा मानस आहे."
आपल्या भाषणात शरद पवारांनी असंही म्हटलं होतं की, "रिक्त झालेल्या अध्यक्षपदाच्या निवडीबाबत निर्णय घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील सदस्यांची एक समिती गठित करावी असं मी सुचवू इच्छितो. गेल्या 60 वर्षात महाराष्ट्राने व आपण सर्वांनी मला खंबीर साथ व प्रेम दिले हे मी विसरू शकत नाही. परंतु यापुढे पक्ष संघटनेच्या संदर्भात पुढील दिशा ठरवणे आवश्यक आहे."
 
मात्र, कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी विरोध दर्शवल्यानंतर शरद पवारांनी हा निर्णय मागे घेतला होता.
 
राजीनामा मागे घेताना 5 मे 2023 रोजी शरद पवार म्हणाले होते की, "राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदावरून निवृत्तीच्या निर्णयानंतर तीव्र पडसाद उमटले. कार्यकर्ते आणि नेत्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली. माझ्याकडून कार्यकर्त्यांच्या भावनांचा अनादर होऊ शकत नाही. कार्यकर्त्यांच्या भावनेचा आदर राखत राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होण्याचा निर्णय मागे घेत आहे."
 




Published By- Priya Dixit 
 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Bhishma Panchak 2024 : आजपासून भीष्म पंचक व्रत, जाणून घ्या पूजा पद्धत आणि महत्त्व

Sun Transit 2024: सूर्याचे वृश्चिक राशीत संक्रमण, 3 राशीच्या लोकांना सतर्क राहावे लागेल

Guru Nanak Jayanti 2024: गुरु नानक जयंती कधी ? प्रकाश पर्व कसे साजरे करायचे जाणून घ्या

पतीच्या घोरण्यामुळे झोप मोड होतेय ? कारणे आणि घोरणे थांबवण्यासाठी 5 घरगुती उपाय

डोकेदुखीपासून मुक्त होण्यासाठी या सोप्या घरगुती उपायांचा अवलंब करा

सर्व पहा

नवीन

Maharashtra Assembly Election 2024 Live in Marathi मोदी सरकार वक्फ कायद्यात सुधारणा करणार, अमित शहांची घोषणा

येमेनच्या हुथी बंडखोरांचा अमेरिकन युद्धनौकांवर ड्रोन-क्षेपणास्त्रांनी हल्ला

Maharashtra Elections 2024: मोदी सरकार वक्फ कायद्यात सुधारणा करणार, अमित शहांची घोषणा

उद्धव ठाकरेंच्या बॅग तपासणी प्रकरणावर भाजपचे प्रत्युत्तर

IND vs SA : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तिसरा T20 कधी होणार जाणून घ्या

पुढील लेख
Show comments