राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष जेष्ठ नेते महाविकास आघाडीतील प्रमुख घटक शरद पवार हे वयाची ८१ वर्ष पूर्ण होत आहे. कोरोना असल्यामुळे शरद पवार कुणाकडूनही प्रत्यक्ष शुभेच्छा स्वीकारणार नाहीत. तर व्हर्च्युअल रॅली (ऑनलाईन) च्या माध्यमातूनच ते संवाद साधणार आहेत. त्यामुळे १२ डिसेंबर रोजी त्यांना भेटण्यासाठी कुणीही येऊ नये, असं आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केलं आहे.
ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर व्हर्च्युअल रॅली ही मोजक्याच मान्यवरांच्या उपस्थितीत कोरोना नियमांचे पालन करुन रविवार १२ डिसेंबर रोजी नेहरु सेंटर वरळी येथे सकाळी ११ ते १ या वेळेत पार पडणार आहे. वाढदिवसानिमित्त होणारी ही अभूतपूर्व व्हर्च्युअल रॅली पक्षाच्या अधिकृत फेसबुक पेज व युट्यूब चॅनेलवर थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे, अशी माहिती जयंत पाटील यांनी दिली.
शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही दरवर्षी पक्षाच्यावतीने नवीन उपक्रमाची घोषणा करत असल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले. पक्ष संघटना व कार्यकर्ते यांच्यातील समन्वय अधिक सक्षम होण्याकरिता एका महत्वाच्या अॅपचे उद्घाटन होणार असून विद्यार्थी संघटनेला महाराष्ट्र युथ कार्निवल असा आगामी काळाकरीता विशिष्ट कार्यक्रम देण्यात येणार आहे, असेही त्यांनी सांगितले.
स्वाभिमान सप्ताहाचे आयोजन
१४ ते २० डिसेंबर या कालावधीत स्वाभिमान सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये पक्षाची फादर बॉडी, फ्रंटल व सेलच्या विभागामार्फत सभासद नोंदणी कार्यक्रम, आरोग्य, रक्तदान शिबीर, औषध वाटप, वृक्ष लागवड, पर्यावरण विषयक कार्यक्रम, याशिवाय कोरोनाचा संभाव्य धोका लक्षात घेऊन सर्व नागरिकांनी लस घेणे अत्यंत गरजेचे आहे. त्यासाठी कोरोना लस घेण्याबाबत जनजागृती व इतर समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात येणार आहे, असेही त्यांनी सांगितले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे कोषाध्यक्ष व माजी आमदार हेमंत टकले, प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे, प्रदेश प्रवक्ते महेश चव्हाण, विद्यार्थी प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे उपस्थित होते.