“यापुर्वीही सातारा जिल्ह्यातून अनेक मुख्यमंत्री झालेत. आताही सातारा जिल्ह्याला लॉटरी लागली आहे. शिवसेनतील एवढे आमदार आपल्या बाजूने वळवणे ही साधी गोष्ट नाहीय. शिंदे शिवसेनेत प्रभावी ठरले त्यामुळेच ते ही गोष्ट करू शकले. मी शिंदेंना फोनवरून शुभेच्छा दिल्या आहेत.”
पत्रकार परिषदेत बोलताना शरद पवार यांनी, सांगितले की, शिवसेनेत बंड होणं हे काही पहिल्यांदाच झालं नाही. जे शिवसेनेतून बाहेर गेले ते निवडून आले नाहीत. छगन भुजबळ आणि नारायण राणे ही उदाहरणे आहेत. “शिवसेनेत बंड झालं हे काही पहिल्यांदाच झालं नाही, जे लोक शिवसेनेतून बाहेर गेले, ते नंतर पराभूत झाले. छगन भुजबळ आणि नारायण राणे हे पराभूत झाले. या घडामोडीत उद्धव ठाकरे हे सत्तेला चिकटून राहिले नाहीत हा त्यांचा निर्णय योग्यच आहे.” असे शरद पवार म्हणाले.
“शिंदे मुख्यमंत्री होतील ही कल्पना नव्हती. देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली असली तरी त्यांनी हे आनंदाने स्वीकारलं आहे असं काही दिसत नाही. त्यांचा चेहराच तस सांगतोय. पण नागपूरचे आणि स्वयंसेवक संघाचे असल्यामुळे देवेंद्र फडणवीस आदेश आल्यानंतर तो स्वीकारणे हे त्यांचे संस्कार आहेत.”
“ईडी आणि इतर केंद्रीय तपास एजन्सीचा उपयोग हा राजकीय विचारांच्या विरोधात केला जात आहे असं शरद पवार मत व्यक्त केलं. तसेच आगामी निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचा विचार अद्याप झाला नाही.” असे शरद पवार यांनी पत्रकारांना सांगितलं.