सांगलीच्या हरभट रोडवरील बाजारपेठेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व्यापाऱ्यांच्या व्यथा जाणून घेत असतानाच मोठा गोंधळ झाला.भाजप कार्यकर्त्यांनी अचानक सरकारच्या विरोधात घोषणाबाजी देत रस्त्यावर ठिय्या आंदोलन केले. त्यामुळे तिथे जमलेल्या शिवसैनिकांनीही जोरदार घोषणाबाजी करत भाजपच्या कार्यकर्त्यांना हुसकावून लावण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे या ठिकाणी एकच गोंधळ उडाला. शेवटी पोलिसांनी धाव घेऊन दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांना बाजूला सारण्याचा प्रयत्न केला.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज सांगलीत आहेत. सांगलीच्या गावागावात जाऊन ते पूरग्रस्तांच्या व्यथा जाणून घेत आहेत.त्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न करत आहेत. दुपारी एकच्या सुमारास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सांगलीच्या हरभट रोडवरील बाजारपेठेत आले. यावेळी त्यांनी व्यापाऱ्यांचं म्हणणं ऐकून घेत त्यांचे निवेदनेही स्वीकारले. पण अचानक भाजपच्या कार्यकर्त्यांनी जोरदार गोंधळ घातला. सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. त्यानंतर भाजपचे कार्यकर्ते रस्त्यावर बसले आणि जोरदार घोषणा देत ठिय्या आंदोलन सुरू केलं.
भाजप कार्यकर्त्यांनी अचानक गोंधळ घातल्याने शिवसैनिकही आक्रमक झाले. त्यांनीही भाजप विरोधात घोषणाबाजी सुरू केल्या. जय भवानी, जय शिवाजी आणि आवाज कुणाचा,शिवसेनेचा अशा घोषणा देत शिवसैनिकांनी संपूर्ण परिसर दणाणून सोडला. त्यानंतर भाजपच्या कार्यकर्त्यांना हुसकावून लावण्यासाठी शिवसैनिक पुढे सरसावले. त्यामुळे एकच गोंधळ उडाला. गर्दीतील लोक सैरावैरा धावू लागले. त्याचवेळी मुख्यमंत्र्यांचा ताफा या परिसरातून निघून गेला.तर पोलिसांनी तात्काळ धाव घेत शिवसेना आणि भाजपच्या कार्यकर्त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला. मुख्यमंत्री गेल्यानंतरही तब्बल 15 मिनिटं हा गोंधळ सुरूच होता. भाजपचे कार्यकर्ते रस्त्यावर बसून निदर्शने करत होते.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आले. त्यांनी आमची निवेदने घेतली नाहीत.त्याआधीच निघून गेले. हा पूरग्रस्तांचा अपमान आहे. यापूर्वीचे मुख्यमंत्री घरोघरी जावून पूरग्रस्तांचे अश्रू पुसायचे. मात्र, हे मुख्यमंत्री आमचा अपमान करून गेले, असा दावा भाजपच्या कार्यकर्त्यांनी केला.
भाजपचा हा दावा मात्र शिवसैनिकांनी फेटाळून लावला. मुख्यमंत्री सकाळपासून फिरत आहेत. लोकांच्या व्यथा वेदना जाणून घेत आहेत. सांगलीतील इतर गावातील लोकांनी शांतपणे मुख्यमंत्र्यांना निवेदन दिली. मात्र, भाजपने निवेदन न देता स्टंटबाजी करण्याचा प्रयत्न केला, असा दावा शिवसेनेने केला आहे.
भाजप कार्यकर्त्यांची धरपकड
दरम्यान, गोंधळ घालणाऱ्या भाजप कार्यकर्त्यांची पोलिसांनी धरपकड सुरू केली आहे. मुख्यमंत्र्यांच्या पुढील कार्यक्रमात व्यत्यय येऊ नये म्हणून या कार्यकर्त्यांची धरपकड करण्यात आली आहे.