ठाकरे सरकार शिवसेनेतील काही आमदारांमुळं कोसळलं. शिवसेनेच्या 40 आमदारांनी केलेल्या बंडखोरी मुळे उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदावरून राजीनामा द्यावा लागला. त्यांनी मुख्यमंत्रीपदावरून राजीनामा दिल्यानंतर एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री पद मिळाले. आता राष्ट्रपतीपदासाठी भाजपच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देण्याची मागणी शिवसेनेच्या खासदार राहुल शेवाळे यांनी लेखी स्वरूपात पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांना केली आहे. या विषयीचे पत्र खासदार राहुल शेवाळे यांनी खुद्द उद्धव ठाकरे यांना शिवसेना भवनात जाऊन दिले. त्यांनी आपल्या पत्रात लिहिले आहे की,
दिनांक 18 जुलै 2022 रोजी देशाच्या राष्ट्रपती पदाची निवडणूक होणार आहे. ह्या पदासाठी मा.श्री यशवंत सिंह आणि मा. श्रीमती द्रौपदी मुर्मू हे दोन उमेदवार उभे आहेत. मा. मुर्मू ह्या आदिवासी समाजातील एका कतृत्त्ववान महिला आहेत. त्यांचे सामाजिक क्षेत्रात बहुमूल्य योगदान आहे.त्या राजकारणात येण्यापूर्वी शिक्षिका होत्या. नंतर त्यांनी अरोबिंदो इंट्रिगल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट, रायंगपुर येथे सहाय्यक प्रबंधक म्हणून कामगिरी केली आहे. या नंतर त्या ओडिसा सरकारच्या सिंचन विभागात कनिष्ठ सहायक पदावर कार्यरत होत्या. मा. मुर्मू यांनी झारखंडच्या राज्यपाल म्हणून कामगिरी बजावली आहे. वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांनी महाराष्ट्राची कतृत्त्ववान महिला देशाच्या सर्वोच्च पदावर विराजमान व्हावी, याच हेतूने माजी राष्ट्रपती माननीय प्रतिभाताई पाटील यांना राष्ट्रपती पदासाठी पाठिंबा दर्शविला होता.तसेच दिवंगत माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या कतृत्त्वाचा आदर करत त्यावेळी देखील शिवसेनेने त्यांना पाठिंबा दिला होता. हीच परंपरा कायम ठेवत, आदिवासी समाजातील एका कतृत्त्ववान महिलेचा सन्मान करण्यासाठी शिवसेना पक्षाने द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा द्यावा आणि त्यासाठी पक्षाच्या सर्व खासदारांना आदेश द्यावे अशी विनंती आणि मागणी करतो.
द्रौपदी मुर्मू यांचा जन्म 20 जून 1958 रोजी झाला. त्या 64 वर्षांच्या आहेतद्रौपदी मुर्मू या स्वतंत्र भारतात जन्मलेल्या देशाच्या पहिल्या राष्ट्रपती असतील मुर्मू या निवडणुकीत विजयी झाल्या तर त्या पहिल्या आदिवासी महिला राष्ट्रपती होण्याचा विक्रम नावावर करतील.