पणजी : गोवा विधानसभा निवडणुकीत भाजपला रोखण्यासाठी काँग्रेसनं राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेला सोबत घेण्याची मागणी राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या नेत्यांकडून करण्यात येत होती. मात्र, महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचं चित्र गोव्यात दिसणार नसल्याचं आता स्पष्ट झालं आहे. कारण, राष्ट्रवादी काँग्रेस गोव्यात काँग्रेससोबत आघाडी करणार नसल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी स्पष्ट केलंय. तसंच राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्र निवडणूक लढवणार असल्याचे संकेत पटेल यांनी दिले आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल, जितेंद्र आव्हाड आणि शिवसेनेचे नेते संजय राऊत सध्या गोवा दौऱ्यावर आहेत. गोव्यातही महाराष्ट्राप्रमाणे प्रयोग करण्याचा विचार होता. मात्र, काँग्रेसकडून त्याला नकार देण्यात आला आहे. त्याबाबत बोलताना पटेल म्हणाले की, काँग्रेसचं म्हणणं आहे की ते गोव्यात आपल्या बळावर निवडणूक जिंकू शकते.
समविचारी पक्षात आघाडी व्हायला हवी होती. ती काँग्रेसने मनावर न घेतल्याने होऊ शकली नाही. आपण विचार करायला हवा, महाराष्ट्रात एकत्र आलो म्हणून भाजपला सत्तेपासून बाहेर ठेऊ शकलो. ती मानसिकता देशभरात असायला हवी, तरच भाजपला आपण लांब ठेवू शकू. काँग्रेस इथे भाजपला रस्ते मोकळे करीत आहे, असं मत गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केलंय. कुठल्याही आघाडीची चर्चा शेवटपर्यंत सुरु असते. पण तुमच्या मनातच नसेल तर ती बंद होते. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसची चर्चा सुरु आहे, असंही आव्हाड यांनी सांगितलं.