Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
मंगलवार, 15 अक्टूबर 2024
webdunia

पंढरपूर मंदिरातील मूर्तींची विशेष काळजी घ्यायला हवी : डॉ. नीलम गोऱ्हे

neelam gorhe
, शुक्रवार, 15 एप्रिल 2022 (08:09 IST)
वारकरी संप्रदायाचे श्रद्धास्थान असलेल्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरातील दोन्ही मूर्तींची विशेष काळजी  घ्यायला हवी. पुरातत्व विभाग, मंदिर आणि मूर्ती संवर्धन विषयातील तज्ञ यांचे मत तसेच वारकरी संप्रदायाच्या भावना या बाबींची सांगड घालून उपाययोजना कराव्यात. यासाठी पुरातत्व विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मूर्तीची प्रत्यक्ष पाहणी करून उपाययोजनांबाबतचा अभ्यासपूर्ण अहवाल येत्या 5 मे पर्यंत सादर करावा, अशा सूचना आज विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केल्या.
 
पंढरपूर येथील रुक्मिणी मातेच्या मूर्तीचा वज्रलेप निघत असल्याचे वृत्त नुकतेच प्रसिद्ध झाले होते.  यामुळे पंढरपूर येथील नागरिक आणि वारकरी संप्रदायामध्ये काळजीचे वातावरण निर्माण झाले होते. या पार्श्वभूमीवर डॉ. नीलम गोऱ्हे यांनी संबंधित अधिकाऱ्यांशी दूरदृश्य प्रणालीद्वारे  संवाद साधला.
 
मंदिराच्या गर्भगृहात वापरले जाणारे पूजा साहित्य, द्रव पदार्थ यामुळे गाभाऱ्यातील आर्द्रतेचे प्रमाण वाढले असल्याची शक्यता यावेळी पुरातत्व खात्याच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केली. ही आर्द्रता कमी करण्यासाठी मंदिरातील मार्बल काढण्याबाबत योग्य, निर्दोष पद्धतीचा अवलंब करण्यासाठी संबंधित विभागाची परवानगी घ्यावी. वज्रलेपाची झीज थांबविण्याबाबत तज्ज्ञांचे मार्गदर्शन, इतर मंदिरात केलेल्या उपाययोजना, त्या त्या  मंदिर समित्यांचा अनुभव लक्षात घेऊन पुढील निर्णय घ्यावा, असेही उपसभापतींनी स्पष्ट केले.
 
पुरातत्व खात्याचा अहवाल आल्यानंतर प्रस्तावित उपाययोजनांविषयी निश्चित धोरण ठरविता येईल, असे सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी यावेळी सांगितले. या बैठकीला मंदिर समितीचे औसेकर महाराज, पुरातत्व विभागाचे वरिष्ठ अधिकारी श्रीकांत मिश्रा, सहायक संचालक विलास वाहने, मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी गजानन गुरव आदी वरिष्ठ अधिकारी ऑनलाईन पद्धतीने उपस्थित होते.
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

सन २०२१-२२ यावर्षी सतरा हजार कोटींचा महसूल जमा – राज्य उत्पादन शुल्क विभागाची माहिती