दादांच्या नेतृत्वात पुणे, पिंपरी-चिंचवडचा विकास झाला. सत्तांतर झाले आणि येथील विकास खुंटला. लोक या सरकारला चार वर्षातच त्रस्त झाले आहेत. त्यांना बदल हवा आहे. म्हणून प्रचंड जनसमुदाय या सभेला जमला आहे, असे प्रतिपादन प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी केले. हल्लाबोल आंदोलनात खराडी, #वडगाव येथील सभेत ते बोलत होते.
ते पुढे म्हणाले की मॅग्नेटीक महाराष्ट्र, मेक इन महाराष्ट्र असे मोठे कार्यक्रम सरकारने घेतले. मोठा रोजगार यातून उत्पन्न होईल असे म्हटले गेले होते, पण तसे काहीही झाले नाही. भाजपची स्थापना होऊन अनेक वर्षे झाली. यांनी कधी स्थापना दिवस साजरा केला नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या हल्लाबोल आंदोलनाला घाबरून या सरकारने शक्तीप्रदर्शन करण्याचा प्रयत्न केला. भाजपचा हा प्रयत्नही फसला. मुख्यमंत्र्यांनी या सभेत शरद पवार साहेबांवर टीका केली. ही टीका करण्याची तुमची लायकीच नाही. तुम्ही गुडघ्यावर रांगत होतात, तेव्हा पवार साहेबांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती, असे ते म्हणाले.
आजचे सरकार निव्वळ सत्ता आणि सत्तेच्या माध्यमातून पैशांसाठी येथे आहे. लोकांमध्ये भांडणे कशी लावून द्यायची? हे या सरकारला चांगले जमते. पण पुण्यातील कचऱ्याची विल्हेवाट लावण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले होते. ती विल्हेवाट साडे तीन वर्षात लावली गेली नाही. पुण्यातील एकही प्रश्न या सरकारने सोडला नाही. सरकार सत्तेच्या धुंदीत मश्गुल आहे, असे विधिमंडळ पक्षनेते अजित पवार म्हणाले.
जे महत्त्वाच्या पदावर असतात ते कधीच उपोषणाला बसत नाहीत. जर सरकारमधील लोकच उपोषणाला बसले, तर यांचे उपोषण सोडवणार कोण? यांचे निवदेन घेणार कोण? यांचे ऐकून घेणार कोण? यांचे म्हणणे ऐकण्यासाठी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना बोलवायचे का?, असा सवाल त्यांनी केला.
या सरकारच्या काळात रोजगाराचा प्रश्न सुटला नाही. आघाडी सरकार असताना या भागात अनेक कारखाने, कंपन्या आणल्या गेल्या. या सरकारने मात्र एकही गुंतवणूक येथे आणली नाही. हे सरकार सर्व गोष्टी महाग देते. पण शेतकऱ्यांना भाव मिळत नाही. मग मधला मलिदा जातो कुठे? ८ ते ९ वर्षांच्या मुलीवर आज बलात्कार होत आहे. राज्यातील कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे. रस्ते नीट नाहीत. सरकार काय करत आहे? ही जबाबदारी सरकारची नाही का? त्यांच्या जबाबदारीची जाणीव करून देण्यासाठी हा हल्लाबोल आहे, असे ते म्हणाले.