उपमुख्यमंत्री अजित पवार हे रविवारी सातारा दौऱ्यावर होते. यावेळी ते विकासकामांचा आढावा घेण्यासाठी शासकीय विश्रामगृहावर पोहोचले. अजित पवार साताऱ्यात असल्याने त्यांना भेटण्यासाठी कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. यावेळी एका कार्यकर्त्याने शासकीय विश्रामगृहातील कर्मचाऱ्याकडे पाणी मागितले. मात्र कर्मचाऱ्याने त्याला साधी बाटली देऊ केली. यानंतर कार्यकर्त्याने कर्मचाऱ्याकडे बिसलेरीची बाटली मागितली, मात्र कर्मचाऱ्याने न दिल्याने त्या दोघांमध्ये वाद झाला.
कार्यकर्त्याने थेट अजित पवारांकडे धाव घेतली आणि शासकीय विश्रामगृहात पिण्यासाठी पाणी देत नसल्याची तक्रार केली. यानंतर अजित पवार संतापले आणि त्यांनी विश्रामगृहातील अधिकाऱ्याला फैलावर घेतले. अधिकाऱ्याला दम भरताना अजित पवार म्हणाले की, संबंधित कर्मचारी या ठिकाणी दिसला नाही पाहिजे. जर दिसला तर तुम्ही दिसणार नाही. तसेच मी याठिकाणी आल्यानंतर सर्व बिले चुकते करतो, असे अजित पवार यांनी स्पष्ट केले.
Edited By - Ratnadeep ranshoor