Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

आषाढी वारीचं संपूर्ण वेळापत्रक, या तारखांना होणार ज्ञानोबा-तुकोबांच्या पालख्यांचे प्रस्थान

vitthal pandharpur
, बुधवार, 1 जून 2022 (16:00 IST)
कोरोनाच्या दोन वर्षांच्या खंडानंतर 2022 या यंदाच्या वर्षी पंढरपूरची आषाढी वारी पुन्हा एकदा होणार आहे. गेली दोन वर्षे कोरोनामुळे विविध प्रकारची बंधनं या सोहळ्यावर आली होती. कधी एसटीने तर कधी वेगळ्या पद्धतीने संतांच्या पालख्या पंढरपुरात दाखल झाल्या होत्या.
 
आता मात्र कोरोनाची सर्व बंधने रद्द केल्यामुळे चंद्रभागेच्या वाळवंटात महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून वैष्णवभाई एकत्र होतील. आषाढी एकादशीचा सोहळा सर्व वारकऱ्यांना चालत पंढरपूरला जाऊन अनुभवता येणार आहे. या यंदाच्या वारीच्या सोहळ्याचा कार्यक्रम जाहीर झाला आहे.
 
संत ज्ञानेश्वरांच्या पालखीचे प्रस्थान 21 जून रोजी होईल. यंदा पालखी सोहळ्यात तिथीची वृद्धी झाली आहे. त्यामुळे लोणंदमध्ये अडीच दिवस तर फलटणमध्ये दोन दिवस पालखी मुक्कामी असेल.
 
दिंडीकऱ्यांच्या मागणीनुसार यंदापासून संस्थानच्या सही शिक्क्याने वाहनपास दिले जातील, अशी माहिती संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळाप्रमुख ॲड. विकास ढगे पाटील यांनी दिली.
 
श्री क्षेत्र पंढरपूर येथील संत ज्ञानेश्वर महाराज मठात आषाढीवारी पायी दिंडी पालखी सोहळा नियोजनाची बैठक झाली. पालखी सोहळ्याचे प्रमुख बाळासाहेब आरफळकर यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली.
 
या बैठकीस श्रीमंत उर्जितसिंह शितोळे, प्रमुख विश्वस्त योगेश देसाई, विश्वस्त डॉ. अभय टिळक, हभप नामदेव महाराज वासकर, राणू महाराज वासकर, श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीचे विश्वस्थ माऊली जळगावकर, दिंडी समाजाचे अध्यक्ष भाऊमहाराज गोसावी, सचिव मारुती कोकाटे, बाळासाहेब रंदवे, भागवत चवरे, भाऊ फुरसुंगीकर, सोपानकाका टेंबुकर, गुरुजीबुवा राशिनकर, शरद गायकवाड, बाळासाहेब उकळीकर, एकनाथ हांडे, दिनकर वांजळे, राजाभाऊ थोरात, बाळासाहेब वांजळे, व्यवस्थापक माऊली वीर, सह व्यवस्थापक श्रीधर सरनाईक यांच्यासह दिंडीप्रमुख व फडकरी उपस्थित होते .
 
संत ज्ञानेश्वरांच्या पालखीचे वेळापत्रक
* मंगळवार 21 जून रोजी सायंकाळी 4 वाजता श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा आळंदी येथून प्रस्थान करेल.
* बुधवार 22 व गुरुवार दि 23 रोजी पुणे , शुक्रवार 24 व शनिवार 25 रोजी सासवड
* रविवार 26 रोजी जेजुरी, सोमवार 27 रोजी वाल्हे, मंगळवार 28 व बुधवार 29 रोजी लोणंद,
* गुरुवार 30 रोजी तरडगांव, शुक्रवार 1 व शनिवार 2 जुलै रोजी फलटण
* रविवार 3 रोजी बरड, सोमवार 4 रोजी नातेपुते, मंगळवार 5 रोजी माळशिरस
* बुधवार 6 रोजी वेळापूर , गुरुवार 7 रोजी भंडीशेगाव
* शुक्रवार 8 रोजी वाखरी तर शनिवार 9 रोजी श्री क्षेत्र पंढरपुर मुक्कामी सोहळा पोहोचेल.
* रविवार 10 जुलै रोजी आषाढी एकादशीचा महासोहळा होणार आहे.

पालखी सोहळ्यात चांदोबाचा लिंब , बाजीराव विहीर व इसबावी येथे उभे रिंगण होईल.
पुरंदावडे (सदशिवनगर), पानीव पाटी, ठाकुरबुवा व बाजीराव विहीर येथे अश्वांचे गोल रिंगण होणार आहे.
संत तुकाराम पालखी वेळापत्रक
20 जून 2022 - पालखी प्रस्थान
 
21 जून 2022 - आकुर्डी
 
22 आणि 23 जून 2022 - नानापेठ, पुठे
 
24 जून 2022 - लोणी काळभोर
 
25 जून 2022 - यवत
 
26 जून 2022 वरवंड
 
27 जून 2022 - उंडवडी
 
28 जून 2022 - बारामती
 
29 जून 2022 - सणसर
 
30 जून 2022 - आंधुर्णे
 
1 जुलै 2022 - निमगाव केतकी
 
2 आणि 3 जुलै 2022 - इंदापूर
 
4 जुलै 2022 - सराटी
 
5 जुलै 2022 - अकलूज
 
6 जुलै 2022 - बोरगाव
 
7 जुलै 2022 - पिराची कुरोली
 
8 जुलै 2022 - वाखरी
 
9 जुलै 2022 - पंढरपूर
 
10 जुलै 2022 - आषाढी एकादशी
 
पालखी सोहळ्यातील अवांतर गर्दी कमी करण्यासाठी ज्यांच्याकडे पास नाही अशी वाहने वारीत सोडू नयेत. याबाबत पोलिसांना माहिती द्यावी. वाहनांना पास देताना पूर्वी वारकऱ्यांची अडवणूक होत होती. ती अडवणूक थांबविण्यासाठी वाहनांचे पास हे संस्थानच्या सहीने द्यावेत अशी मागणी त्यांनी केली. त्यास सर्व दिंडीप्रमुखांनी टाळ्यांच्या गजरात पाठींबा दिला.
 
संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गाचे काम सोहळ्यापूर्वी पूर्ण व्हावीत. सासवड येथील पुलाच्या कामासाठी 6 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. परंतु हे काम अद्याप सुरू झालेले नाही. जेजुरीला नवीन तळासाठी 9 एकर जागा शासनाने उपलब्ध करुन दिली आहे. तिचा ताबा मिळावा.
 
पालखी सोहळ्यापूर्वी पालखीतळ सुसज्ज व्हावेत. रस्ता रुंदीकरणामध्ये अनेक दिंड्यांच्या दुपारच्या जेवणाच्या व मुक्कामाच्या जागा बदलल्या आहेत. पोलिसांना माहिती नसते. ते गाड्या लावू देत नाहीत.
 
त्यासाठी पोलिस प्रशासनाला माहिती द्यावी. राष्ट्रीय महामार्गावर रस्ता दुभाजक अखंड असल्याने पालखी सोहळ्याची वाहने उजवीकडून डावीकडे येण्यास अडचण निर्माण होणार आहे. त्यासाठी नियोजन व्हावे.
 
पालखी महामार्गावरील मद्यपानाची दुकाने रस्त्यापासून 500 ते 700 मीटर अंतर दूरवर असावीत. पालखी तळासाठी 25 एकर जागा आरक्षित ठेवावी. कुंभमेळ्याच्या धर्तीवर पालखी तळासाठी जागा आरक्षित ठेवावी.
 
माळशिरसला गंगूकाका शिरवळकर यांची समाधी गायब झाली आहे तर वेळापूरचा धावाच नष्ट झाला आहे. वेळापूर येथील मानाच्या भारुडासाठी जागा उपलब्ध करावी. अशा विविध मुद्दे उपस्थित करण्यात आले, त्यावर तोडगा काढला जाणार आहे.

संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात रथापुढे 27 तर रथामागे 251 दिंड्या नोंदणीकृत आहेत . तसेच नोंदणी नसलेल्या 125 ते 150 दिंड्या आहेत. सोहळ्यातील या दिंड्यांना वाहन पास दिले जातील. वाहनपासाचा गैरवापर टाळण्यासाठी नोंदणीकृत दिंडी चालकाने 15 मे पर्यंत वाहनांचे नंबर, वाहनचालकाचे नांव व मोबाईल नंबर संस्थानकडे द्यावेत.
 
यंदा माऊली सोबत सुमारे पाच लाख वारकरी असतील. त्यादृष्टीने पालखीतळ, आरोग्य, पाणी, वीज, रस्ता व सुरक्षा याबाबत शासनाकडे योग्य तो पाठपुरावा केला जाईल, असं पालखीसोहळा प्रमुख ॲड. विकास ढगे पाटील म्हणाले.
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

खाद्यतेल स्वस्त होणार