उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूरमधील निवासस्थानाबाहेर यांच्या घराबाहेर विदर्भवादी कार्यकर्त्यांकडून आंदोलन करण्यात येत आहे.ऑगस्ट क्रांती दिनाच्या निमित्तानं आज विदर्भवादी कार्यकर्त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घराबाहेर आंदोलन केलं. नागपुरात विदर्भवादी आक्रमक झाले आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या निवासस्थानाबाहेर काही विदर्भवादी आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
दरम्यान फडणवीस यांच्या घराबाहेर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. विदर्भावादी कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं येथे पाहायला मिळत आहे. विदर्भवादी आंदोलकांना वसंतराव नाईक झोपडपट्टी परिसरात अडवण्यात आलं आहे. संविधान चौकापासून आंदोलकांचा लाँग मार्च सुरु झाला. सुरुवातीला मोर्चा शांततेनं निघाला होता, त्यानंतर पोलिसांनी आंदोलकांना अडवल्यावर आंदोलक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं.
आंदोलक पोलिसांनी लावलेले बॅरिगेट्स ओलांडून फडणवीसांच्या घराकडे जाण्याचा प्रयत्न करत होते. यादरम्यान, पोलिसांना काही आंदोलकांना ताब्यात घेतलं आहे.
या आहेत प्रमुख मागण्या:
वेगळं विदर्भ राज्य ही विदर्भवादी आंदोलकांची प्रमुख मागणी आहे. यासोबतच विज दरवाढीसाह इतर मागण्यांसाठी विदर्भवाद्यांनी हे आंदोलन पुकारलं आहे. विदर्भामध्ये काही जुने औष्णिक वीज प्रकल्प आहेत, त्यासोबतच नव्यानेही प्लांट उभारले जात आहेत. मात्र, विदर्भातील जनतेला त्याचा कोणताही फायदा होत नाही. विदर्भातील जनतेला वीज दरात सूट देण्यात यावी, अशी आंदोलकांची मागणी आहे. उलट औष्णिक वीज प्रकल्पांमुळे प्रदूषणात वाढ होत आहे. त्यामुळे या प्रकल्पांना विदर्भवाद्यांचा विरोध आहे.