एकीकडे कोरोना लसीच्या वापरावरून केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी महाराष्ट्र सरकारला धारेवर धरले असताना, राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी मात्र राज्यात दहा दिवस पुरेल एवढाच लसीचा साठा असल्याचे म्हटले आहे. महाराष्ट्राला दिलेल्या 54 लाख लसींपैकी केवळ 23 लाख लसींचाच वापर झाल्याचे ट्वीट आज प्रकाश जावडेकर यांनी केले. पत्रकार परिषदेत राजेश टोपे यांनी राज्यातील लसीकरणाची परिस्थिती सांगितली.
आठवड्याला 20 लाख डोस आवश्यक
राजेश टोपे म्हणाले, राज्यात लसीकरणावर भर दिला जात आहे. राज्यात एकूण 1880 सेंटर मंजूर झाले आहेत. आतापर्यंत 33 लाख 65 हजार 952 लोकांचे लसीकरण केले आहे. यामध्ये आरोग्य कर्मचारी, फ्रंट लाईन वर्कर, 60 वर्षांवरील आणि 45 वर्षांवरील इतर आजार असलेल्या लोकांचा समावेश आहे. काल दिवसभरात 2 लाख 32 हजार 340 एवढ्या लोकांचे लसीकरण झाले आहे. आता दिवसाला 3 लाख लोकांचे लसीकरण करण्याचा निर्धार केला आहे. त्यासाठी कोरोना लसही तेवढ्यात प्रमाणात प्राप्त होणे गरजेचे आहे. साधारणपणे एक कोटींहून लोकांचे लसीकरण करायचे आहे. दोन कोटी 30 लाख डोस आपल्याला येत्या तीन महिन्यात आवश्यक आहेत. त्यासाठी आठवड्याला 20 लाख डोस आवश्यक आहे. मी स्वत: काल केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन, आरोग्य सचिव राजेश भूषण यांना भेटून विनंती केली आहे.