मुंबई : महाराष्ट्रात ऑगस्ट महिन्यात विश्रांती घेतलेल्या पावसाने सप्टेंबरच्या सुरुवातीला मात्र सर्वत्र हजेरी लावली. यामुळे रखडलेल्या शेतीच्या कामांना वेग आला. राज्यात सप्टेंबरच्या सुरुवातीला चांगला पाऊस झाला. यामुळे अनेक जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला होता. पण आता हवामान खात्याच्या अंदाजानुसार ११ सप्टेंबरपासून राज्यात पाऊस पुन्हा विश्रांती घेणार आहे. मराठवाड्यातील बहुतांश भागात आतापर्यंत रिमझिमचीच साथ मिळाली आहे. त्यामुळे पिकांना आधार झाला. परंतु पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर आहे.
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार राज्यात सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात मुसळधार पाऊस झाला. ७ सप्टेंबर ते १० सप्टेंबरदरम्यान मराठवाडा वगळता ब-याच भागांत सर्वत्र धुवांधार पावसाने हजेरी लावली. त्यामुळे बळीराजा सुखावला होता. यामुळे शेतीच्या कामांनाही वेग आला. पण अशात आता हवामान खात्याकडून पावसासंबंधी एक नवे अपडेट देण्यात आले आहे. पुढचे तीन दिवस पाऊस विश्रांती घेणार असल्याचा अंदाज आहे.
आज राज्यातील कोणत्याही जिल्ह्यात पावसाचा अंदाज नाही. संपूर्ण महाराष्ट्राला आज ग्रीन अलर्ट देण्यात आला आहे. यामुळे पुढचे तीन दिवस पाऊस दडी मारेल. यावेळी जिल्ह्यांमध्ये उष्णता जाणवेल, असा इशाराही हवामान खात्याकडून देण्यात आला आहे.