कोरोनाकाळातील सेवेसाठी प्रशासनाने वापरलेल्या जागेच्या भाड्यापोटी त्र्यंबकेश्वर देवस्थानने प्रशासनाकडे चक्क एक कोटी रुपयांची मागणी केली आहे. त्यामुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे.
कोरोनाच्या संकटात अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी त्यासाठी पुढाकार घेतला. अनेक देवस्थानांनी आपल्या तिजोऱ्या रित्या केल्या. मात्र त्र्यंबकेश्वर देवस्थानची जागा प्रशासनाने कोरोनाकाळातील सेवेसाठी अधिग्रहित केली होती. या जागेच्या भाड्यापोटी आता देवस्थानने प्रशासनाकडे तब्बल 99 लाख 63 हजार रुपये इतक्या रकमेची मागणी केल्याने नवा वाद निर्माण झालाय. या इतक्या मोठ्या रकमेच्या मागणीनंतर जिल्हा प्रशासनाने देवस्थानला त्यांच्या जबाबदारीची जाणीव करून देणारे खरमरीत पत्र लिहून कान टोचले आहेत.
जिल्हा प्रशासनाने त्र्यंबक देवस्थानला लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, आपल्या संस्थानाची नोंद सार्वजनिक न्यास स्वरूपाच्या सेवाभावी संस्थानात आहे. त्यामुळे अशा संस्थानाने शासनाच्या मोफत उपचाराच्या प्रयत्नास सहकार्य करणे आवश्यक होते. तथापि, असे न करता आपण अनाकलनीय व कोणताही खुलासा नसलेली पैशांची मागणी केली आहे. आपली ही मागणी योग्य नाही, अशा शब्दांत त्र्यंबक देवस्थानच्या पदाधिकाऱ्यांना उपदेशाचे बोधामृत पाजले आहे. शिवाय प्रशासनाने संस्थानला विस्तृत कागदपत्रे सादर करण्याचे आदेश दिले आहेत.