सध्या उकाड्याने जळगावकर हैराण झाले आहे. जळगावात उन्हाचे तापमान वाढले असून प्राणी देखील उकाड्याने हैराण झाले आहे.अन्न आणि पाण्याच्या शोधात माकडाची टोळी पिलखेडा गावात आली. या टोळीतील एका माकडाचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाला. गावातील नागरिकांनी माणुसकी दाखवत माकडावर दयाकरून त्याचे अंत्यसंस्कार करत दशक्रिया विधी केली आहे. आणि दुखवटा म्हणून संपूर्ण गावात सुतक पाळून गावातील तरुणांनी मुंडन केलं आहे. आणि वर्गणी गोळा करून गाव जेवण केलं.
हे संपूर्ण प्रकरण आहे जळगावातील पिलखेडा गावाचे. माकडाची टोळी या गावात नेहमी अन्न आणि पाणी शोधायला येत असते. या टोळीतील एका माकडाचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाला. माकडाला वाचविण्यासाठी गावकरी त्या माकडाला जळगाव पशु वैद्यकीय रुग्णालयात घेऊन गेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. गावात माकडाचा मृत्यू झाल्यामुळे त्यांची अंत्ययात्रा काढण्यात आली आणि त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. एवढेच नाही तर 10 दिवस गावकऱ्यांनी या माकडाचा दुखवटा पाळला आणि दशक्रिया विधी करत गावातील तरुणांनी मुंडन केले. नंतर वर्गणी गोळा करून संपूर्ण गावाला जेवण दिले. गावात हनुमान चालिसाचे पठण करण्यात आले. गावकऱ्यांच्या प्राण्यासाठी दाखवलेल्या माणुसकी आणि भूतदयासाठी सर्वत्र कौतुक होत आहे.