तब्बल २० वर्षांपासून अहमदनगरच्या साकत ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या पिंपळवाडी गावास सार्वजनिक पाणीपुरवठा होत नाही. ढीम्म ग्रामपंचायत प्रशासनाला आजपर्यंत गावातील नागरिकांनी खूप वेळा तक्रारी केल्या. मात्र, ग्रामपंचायत प्रशासनाकडून उडवाउडवीची उत्तरे मिळत आहेत.पाण्याच्या समस्येमुळे गावातील नागरिकांना विहिरीवरून शेंदून पाणी आणावे लागत आहे.
या संदर्भात आमदार रोहित पवार हे जनता दरबारच्या निमित्ताने साकत येथे आले होते.यावेळी ग्रामस्थांनी निवेदन देऊन तक्रार केली.गावामध्ये ग्रामपंचायतीच्या दोन विहिरी आहेत.मुख्यमंत्री पेयजल योजनेअंतर्गत एक कोटी निधीची पाणी योजना करण्यात आली.
तरीही गावाला पाणीपुरवठा होत नाही. २० नोव्हेंबर २०२० रोजी गावातील एक महिला धुणे धुण्यासाठी विहिरीवर गेली होती. यावेळी बादलीने पाणी उपसत असताना पाय घसरून ती विहीरीत पडली.
यावेळी ज्ञानेश्वर घोलप या शिक्षकाने धावत येत विहिरीत उडी मारून महिलेचे प्राण वाचवले. पिंपळवाडी गावाला नियमितपणे पाणी पुरवठा व्हावा, यासाठी गावकऱ्यांनी ग्रामसेवक,गटविकास अधिकारी व तहसीलदार यांना भेटून अनेकवेळा निवेदन दिले.उन्हाळ्यामध्ये अजय नेमाने या तरुणाने ट्वीटरवरून पाण्याच्या समस्येबाबत आमदार रोहित पवार यांना टॅग करून ट्वीट केले होते. त्यावेळी फक्त दोनच दिवस पाणी सोडण्यात आले. त्यानंतर जैसे थे परिस्थिती सुरू झाली, असे निवेदन पिंपळवाडी येथील लक्ष्मण घोलप, अजय नेमाने, विशाल नेमाने, विजय घोलप, रवींद्र घोलप, जालिंदर नेमाने, विकास टेकाळे, गोकुळ टेकाळे, अर्जुन मोहिते यांनी दिले.