Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
मंगलवार, 15 अक्टूबर 2024
webdunia

आधारतीर्थ अनाथ आश्रमातील चिमुकल्याच्या हत्येप्रकरणी “ही” माहिती आली समोर

death
, शुक्रवार, 25 नोव्हेंबर 2022 (15:14 IST)
नाशिक : आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांसाठी असलेल्या आधारतीर्थ आश्रमामध्ये एका लहान चिमुकल्याचा संशयास्पद मृत्यू झाल्याची खळबळ दोन दिवसांपूर्वी उडाली होती. याप्रकरणी पोलिसांनी आता संशयित अल्पवयीन विद्यार्थ्याला ताब्यात घेतले आहे. संशयित हा आश्रमातीलच विद्यार्थी असून त्याने चार वर्षीय चिमुकल्याचा किरकोळ वादामधून गळा आवळून खून केला आहे.
 
नाशिक शहरापासून अवघ्या काही अंतरावर असलेल्या त्र्यंबकरोड परिसरातील अंजनेरी भागात हे आधारतीर्थ अनाथ आश्रम आहे. या आश्रमात संपूर्ण राज्यभरामधून आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांची मुले राहतात. परंतु, या आश्रमातील एका चिमुकल्याचा मृत्यू झाल्याने आश्रमाच्या कारभारावर अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. ही घटना उघडकीस येताच याबाबत पोलिसांना माहिती देण्यात आली. यावेळी पोलीस तपासामध्ये धक्कादायक बाब उघड आली आहे. मृत चार वर्षीय चिमुरडा आणि त्याचा मोठा भाऊ याच आश्रमात राहतात. आश्रमातीलच नववीतील एका मुलाचे मोठ्या भावाशी भांडण झाले हाेते.
 
त्यातूनच ही हत्या झाल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. आधारतीर्थ आश्रमात मंगळवारी (दि. 22) सकाळी 6 वाजेच्या सुमारास चार वर्षीय मुलाचा मृतदेह संशयास्पदरित्या आढळला होता. यानंतर पोलिसांकडून तपास चालू होता. शवविच्छेदन अहवालात आलोकचा गळा आवळून खून झाल्याचे निष्पन्न झाले होते. या प्रकरणी त्र्यंबकेश्वर पोलिस स्टेशनमध्ये अज्ञात मारेकऱ्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
 
नाशिक त्र्यंबकेश्वर रस्त्यावर असलेल्या तुपादेवी गावाजवळ अंजनेरी येथे हे आश्रम आहे. या ठिकाणी ही घटना घडली आहे. राज्यामधील ज्या शेतकर्‍यांनी आत्महत्या केली आहे, त्यांचे कुटुंब हलाखीच्या परिस्थितीत जीवन व्यतीत करत आहे, अशा आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची मुले या आश्रमात राहतात. आधारतीर्थ आश्रमात घडलेल्या या घटनेने आश्रमातील मुलांमध्ये घबराटीचे वातावरण तयार झाले आहे. चार वर्षाच्या चिमुकल्याचा हत्येनंतर सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
 
 Edited By- Ratnadeep Ranshoor

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

FIFA World Cup 2022: कोरियाने उरुग्वेला बरोबरीत रोखले