वाढत्या उन्हाच्या कडाक्यात वीजेची मागणी असतानाच राज्याच्या ऊर्जामंत्र्यांनी महत्त्वाची घोषणा केली आहे. ऊर्जामंत्री नितीन राऊत म्हणाले की, वीजेची उपलब्धता, निर्मिती आणि कोळशाची टंचाई यामुळे राज्यात लोडशेडिंग सुरू करण्यात आले आहे. राज्याच्या ज्या भागात वीज बील थकबाकी अधिक आहे. तेथे लोडशेडिंग सुरू करण्यात आल्याचे राऊत यांनी स्पष्ट केले आहे. यापुढील काळात कोळसा उपलब्धता आणि वीज निर्मितीचे संतुलन योग्य राहिले नाही तर लोडशेडिंग वाढत जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
राऊत म्हणाले की, केवळ महाराष्ट्रातच नाही तर देशातच वीजेची टंचाई आहे. देशातील एकूण ९ राज्यांमध्ये लोडशेडिंग करण्यात येत आहे. या परिस्थितीला केंद्रातील कोळसा मंत्रालय जबाबदार आहे. कोळशाचा योग्य पुरवठा नाही. तसेच, अदानी पॉवरने काही प्रमाणात वीज कमी केली. सद्यस्थितीत १५०० मेगा वॉट वीजेचा तुटवडा आहे. ती उपलब्ध झाली तर राज्यातील लोडशेडिंग बंद होईल. ज्या भागात वीज बीलांची वसुली कमी आहे तेथे लोडशेडिंग करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यानुसार कार्यवाही सुरू झाली आहे.