नाशिकमधील चांदवड तालुक्यातील हबडीच्या शेंडी डोंगरावर ट्रेकिंग करताना तीन ट्रेकर्स डोंगरावरुन कोसळल्याची घटना घडली आहे. यात दोन तरुण ठार झाले असून 1 जण गंभीर जखमी झाला आहे. जखमीला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. रॅपलिंग करताना डोंगरावरुन तिघे कोसळल्याची घटना घडली. अहमदनगर येथून 8 मुली व 7 मुले असे एकूण 15 जण ट्रेकिंग करण्यासाठी या शेंडीच्या डोंगरावर आले होते. अनिल वाघ आणि मयुर मस्के अशी मयतांची नावे आहेत तर प्रशांत पवार असे जखमी तरुणाचे नाव असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. बाकी ट्रेकर्स सुखरूप आहे. रापली, कातरवाडी, मनमाड शहरातील तरुणांनी अन्य 12 ट्रेकर्सची सुखरुप सुटका केली आहे
हबडीची शेंडी येथे आरोहण मोहिमेत सहभागी होण्यासाठी हे सर्वजण आले होते. सर्व ट्रेकर्स अहमदनगर जिल्ह्यातील रहिवासी होते. अहमदनगरमधील इंद्रप्रस्थ ट्रेकर्सच्या वतीने या आरोहण मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. या मोहिमेत 8 मुली व 7 मुलगे सहभागी झाले होते. आरोहण मोहिम झाल्यानंतर सर्व ट्रेकर्सला खालच्या टप्प्यावर उतरविण्यात आले. शेवटी अनिल वाघ, मयुर मस्के आणि प्रशांत पवार हे तिघे जण खाली उतरत असताना खाली कोसळले. यापैकी अनिल वाघ आणि मयुर मस्के हे दोघे ठार झाले तर प्रशांत पवार जखमी झाला. जखमी प्रशांत पवारला मनमाड येथे उपचारासाठी नेण्यात आले. अपघाताची माहिती मिळताच कातरवाडी ग्रामस्थांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरु केले.