अवनी वाघिणीला ठार केले गेले. तिला नरभक्षक ठरवत ठार केले गेले. आता हेच प्रकरण भाजपाला अडचणीत आणत आहे. भाजपा सरकारवर अंतर्गत आणि बाहेरील पक्ष जोरदार टीका करत आहेत. तर प्राणीमित्र आणि सोशल मिडीया कमालीचा संतप्त झाला आहे. आता तिच्या दोन बछड्यांचे काय करणार ? त्यांना कसे जागवणार असे प्रश्न विचारले जात आहे. यावर मुख्यमंत्री यांनी उत्तर दिले मात्र कोणाचेही समाधान होतांना दिसत नाही.
शिवसेनेन तर या कारवाईची निंदा केली आहे. वाघाच्या घरात गेला तर तो शांत बसेल का ? मग तिची ती चूक काय असा प्रश्न शिवसेनेने विचारला आहे. अवनी तुला भेकड असल्यासारखे त्यांनी मारले असे उद्धव ठाकरे यांनी प्रश्न विचारला आहे. अवनी आम्हाला माफ कर असा सामनात म्हणत आहे. वाचा पूर्ण अग्रलेख :
दुष्काळ, उपासमार, कुपोषण, सरकारी अनास्था, शेतकऱ्यांचे कर्जबाजारीपण यामुळे राज्यात माणसे मरत आहेत, स्वतःचे जीवन संपवून घेत आहेत. मात्र त्यासाठी कोणी सरकारी व्यवस्थेला ‘नर’भक्षक ठरवत नाही. वन्य प्राण्यांना मात्र ‘नरभक्षक’ ठरवून त्यांना शिक्षा दिली जाते. अवनी, तू याच मानवी स्वार्थाची बळी ठरलीस. ज्या राज्यात माणसेही नीट जगू शकत नाहीत त्या राज्यात तुझ्यासारख्या वन्य जीवांचे काय? अवनी, आम्हाला माफ कर. तुला भेकडासारखे मारले. रात्रीच्या अंधारात उंदरांनाही वाघाचे बळ येते.
नरभक्षक म्हणून बदनाम झालेल्या ‘अवनी’ वाघिणीस अखेर गोळ्या घालून ठार करण्यात आले. अवनीस का मारले यावर आता प्राणिमित्रांमध्ये वाद सुरू झाला आहे. यवतमाळ जिह्यातील पांढरकवडा जंगलातील या वाघिणीने हैदोस घातला होता हे खरे. दोन वर्षांत तिने 13 जणांचा जीव घेतला. ही वाघीण पाच वर्षांची होती व तिने नुकताच दोन बछड्यांना जन्म दिला होता. हे दोन्ही बछडे आता निराधार झाल्याचे दुःख वन्य जीवप्रेमींनी व्यक्त केले आहे. अवनी वाघीण नरभक्षक झाली. पण वाघ, सिंह हे नरभक्षक झाले व त्यांनी मनुष्यप्राण्यांवर झडप घातली यात आश्चर्य वाटावे असे काय आहे? सापाच्या बिळात हात घातल्यावर तो डंख मारणारच. सापाच्या शेपटीवर पाय ठेवताच तो काय तुम्हाला गुदगुल्या करणार आहे? वन्य प्राण्यांचेही तेच आहे. माणसाने वाघांच्या प्रदेशात घुसखोरी केली. जंगले तोडली, जाळली. डोंगर फोडले. त्यामुळे वाघांचे जगणे हराम झाले. एवढे सगळे झाल्यावर तुम्ही त्यांच्याकडून कोणत्या माणुसकीची अपेक्षा करता? बोरिवलीच्या राष्ट्रीय उद्यानात व आसपास बिबटे मनुष्यवस्तीत शिरतात व अनेकदा बळी घेतात. कारण राष्ट्रीय उद्यानात मनुष्यवस्ती वाढली. तुम्ही वाघांच्या जागेवर अतिक्रमण केल्यावर वाघ तुमच्यावर आक्रमण करणारच. त्यामुळे वाघांना ‘नरभक्षक’ म्हणून गोळ्या घालण्यापेक्षा मनुष्याने स्वतःस शिस्त लावणे गरजेचे आहे. निदान आता ‘अवनी’च्या निमित्ताने तरी या प्रश्नाचा सरकारी पातळीवर एकत्रितपणे आणि साकल्याने विचार व्हायला हवा. हे काम वन खात्याचे जसे आहे तसे इतर सरकारी खात्यांचेही आहे. एरवी राज्यकर्ती मंडळी सर्वांना घर, ‘घर घर शौचालय’ वगैरे घोषणांचे ढोल पिटत असतात, पण वन्य प्राण्यांच्या हल्ल्यांच्या सावटाखाली एकेक क्षण जगणाऱ्या जनतेला द्या ना त्यांचे हक्काचे सुरक्षित घर. करा त्यांच्या शौचालयाची व्यवस्था. मात्र फक्त घोषणांचीच जुमलाबाजी सुरू असल्याने ‘अवनी’सारख्या घटना घडतात आणि मग वन्य प्राण्यांना ‘नरभक्षक’ ठरवून त्यांचा बळी घेतला जातो. अवनी वाघिणीची हत्या देशभरात गाजते आहे. वाघिणीने गावात घुसून हल्ला केला. त्यात 13 जण मेले. या 13 जणांपैकी फक्त तिघांचे ‘पोस्टमॉर्टम’ झाले आणि त्यातील एकाचीच वाघिणीने हत्या केल्याचे पुरावे अवनीभक्तांनी दिले. शिवाय वाघिणीस ठार करण्याआधी ‘भूल’ द्यायला हवी होती. म्हणजे बेशुद्ध करून मारायला हवे होते, पण वाघीण अंगावर आल्यामुळे तिला थेट गोळ्याच घालण्यात आल्या असा दावा वन खाते करीत आहे. वन खात्याच्या या दाव्यालाही प्राणिमित्र संघटनांनी आता आव्हान दिले आहे. अवनी वाघिणीला गोळ्या घालण्यासाठी हैदराबादहून खास एका एन्काऊंटर स्पेशालिस्टला पांढरकवड्यास बोलावण्यात आले होते. म्हणजे मुंबईतील गुंडांचे जसे एन्काऊंटर मधल्या काळात होत असे व अनेक ‘चकमक’फेम अधिकारी नंतर वादाच्या भोवऱ्यात सापडत तसे आता अवनीच्या चकमकीचे झाले आहे. पुन्हा एवढ्या काळोखात, धावपळीत त्या ‘शूटर’ने बरोबर अवनीच्या वर्मी गोळी कशी मारली हा प्रश्नही उरतोच.नी भाजपवर टीका केली आहे.