राज्याची ग्रामीण आरोग्य यंत्रणा बळकट करण्यासाठी आमचे सर्वोच्च प्राधान्य असून आरोग्य क्षेत्रासाठी दुप्पट निधी देणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यांमध्ये वैद्यकीय महाविद्यालय सुरू करणे, राज्यभर सुमारे ७०० बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना सुरू करणे, बाल आरोग्यावर विशेष लक्ष केंद्रीत करणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. एनडीटिव्ही वृत्तवाहिनीच्या स्वस्थ बनेगा इंडिया या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी ही माहिती दिली. यावेळी ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन, ज्येष्ठ पत्रकार प्रणव रॉय यांनी मुख्यमंत्र्यांसमवेत संवाद साधला.
मुंबईत २२७ ठिकाणी बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना
मुख्यमंत्री शिंदे यावेळी म्हणाले, महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात आरोग्य यंत्रणेचे जाळे मजबूत करण्यावर भर दिला जात आहे. राज्यात सुमारे ७०० ठिकाणी बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना सुरू करण्यात येणार आहेत. आपला दवाखान्याच्या माध्यमातून नागरिकांना घराजवळ आरोग्य सुविधा देण्याचा प्रयत्न असल्याचे सांगतानाच मुंबईत २२७ ठिकाणी असे दवाखाने सुरू करण्यात येणार असून त्यापैकी ५० दवाखाने २ ऑक्टोबरपासून सुरू झाल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
Edited by : Ratnadeep Ranshoor