एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाबाबत तोडगा काढण्यासाठी कृती समितीच्या सदस्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेतली. तसेच परिवहनमंत्री अनिल परब आणि कृती समितीमध्ये एक बैठकही झाली. "सरकारवर विश्वास ठेवा आणि कामावर परत या, तुमच्या सर्व मागण्या मान्य होतील" असं आवाहन शरद पवार यांनी एसटी कर्मचाऱ्यांना केलं आहे. तसेच एसटीच्या विलिनीकरणाचा मुद्दा न्यायप्रविष्ट आहे, त्यामुळे समितीच्या अहवालानंतर त्यासंदर्भात निर्णय घेण्यात येईल असंही म्हटलं आहे.
एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्याबाबत सरकार सकारात्मक आहे, एसटीची बांधिलकी प्रवाशांशी आहे, त्यामुळे एसटी सुरू झाली पाहिजे यावर एकमत झाल्याची माहिती शरद पवारांनी दिली. तसेच विलिनीकरणाच्या मुद्द्यावर राज्य सरकारची भूमिका काय आहे या प्रश्नावर बोलताना "आपल्याला यावर राजकारण करायचे नाही. एसटीची बांधिलकी ही प्रवाशांशी आहे. विलीनीकरणाच्या मागणीवर राज्य सरकारने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. हा मुद्दा आता न्यायप्रविष्ट असल्याने त्यावर काही भाष्य करणे योग्य नाही" असं म्हटलं आहे.