Ulhasnagar Newsउल्हासनगर : येथे कॅम्प नं 3 मोहटा देवी येथील महापालिका आरोग्य केंद्रात लसीकरणानंतर 2 महिन्याच्या मुलीचा मृत्यू झाल्याचा प्रकार उघड झाला आहे. चुकीची औषधे दिल्याने मृत्यू झाल्याचा आरोप होत असल्याने मृतदेह उत्तर तपासणीसाठी मुंबई येथील जे जे रुग्णालयात पाठविला गेला आहे.
मीनाताई ठाकरेनगर येथे राहणाऱ्या काजल कुंदन सावंत या महिला मंगळवारी दुपारी त्यांच्या 2 महिन्याची मुलगी भक्तीला नियमित लसीकरण करण्यासाठी मोहटा देवी येथील महापालिका आरोग्य केंद्रात घेऊन आल्या होत्या. लसीकरण डोस झाल्यानंतर ताप आल्यास गोळ्या कशा घ्यायच्या याबाबत माहिती आशा वर्करने दिली होती. मात्र मुलीला घरी गेल्यावर तापाची गोळी दिल्यांनतर तिची तब्येत बिघडली आणि बुधवारी सकाळी मध्यवर्ती रुग्णालयात उपचार करण्यासाठी नेले असता डॉक्टरांनी मुलीला तपासून मृत झाल्याचे सांगितले.
डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे मुलीचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. मुलीच्या मृत्यूचे कारण स्पष्ट व्हावे यासाठी मृतदेह फॉरेन्सिक लॅब मध्ये तपासणी व शवविच्छेदन साठी जेजे रुग्णालयात पाठविण्यात आला. तसेच पोलीस पंचनाम्यात मुलीचे ओठ काळे पडले असून दातखळी बसल्याचे नमूद केले गेले आहे. तर दोन्ही पायाला इंजेक्शन दिल्याच्या खुणा आहेत.