भाजपा आणि एनडीएच्या विरोधात देशभरातील अनेक विरोधी पक्ष एकत्र आलेल्य़ा इंडिया या विरोधी पक्षांच्या आघाडीचा पंतप्रधापदासाठी उद्धव ठाकरे हेसुद्धा चेहरा असू शकतात असा दावा शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे.
पाच राज्यांच्या निवडणुकीनंतर भाजपविरोधी आघाडी असलेल्या इंडिया आघाडीच्या पुढील बैठकीसाठी जोरदार हालचाली सुरु झाल्या आहेत. या बैठकीमध्ये इंडिया आघाडीच्या येत्या काळातील राजकिय धोरणावर चर्चा होण्यासह, आघाडी अंतर्गत जागा वाटप या मुद्यावरही चर्चा होणार आहे. तर सगळ्यात कळीचा मुद्दा असणारा इंडिया आघाडीसाठी पंतप्रधानपदाचा चेहरा कोण असणार यावरही मार्ग निघणे अपेक्षित आहे.
आज पासून हिवाळी अधिवेशन सुरु होत असून त्यासाठी शिवसेना ठाकरे गटाचे प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत सध्या दिल्लीत आहेत. दिल्लीत माध्यमांशी त्यांनी संवाद साधला. यावेळी उद्धव ठाकरे हे आगामी पंतप्रधानपदाचा चेहरा असू शकतील का ? या प्रश्नावर संजय राऊत मोठ्याने हसले. आपल्या शैलीत बोलताना ते म्हणाले, “उद्धव ठाकरे हा एक हिंदुत्ववादी चेहरा आहे…राष्ट्रवादी चेहरा आहे…..इंडिया आघाडीची मान्यता मिळेल तो नेता पंतप्रधानपदाचा चेहरा होईल. याबाबत आघाडीची अद्याप बैठक झालेली नाही. आम्ही बैठकीबाहेर असं कोणतंही वक्तव्य करणार नाही ज्यामुळे आमच्या आघाडीत कुठलाही मतभेद निर्माण होईल.” असाही खुलासा त्यांनी केला.
Edited by: Ratnadeep Ranshoor