Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
मंगलवार, 15 अक्टूबर 2024
webdunia

UFO : कोल्हापूरमध्ये खरंच उडती तबकडी दिसली का? संशोधन काय सांगतं?

UFO : कोल्हापूरमध्ये खरंच उडती तबकडी दिसली का? संशोधन काय सांगतं?
, शुक्रवार, 3 जून 2022 (19:32 IST)
कोल्हापूरमध्ये काही दिवसांपूर्वी आकाशात एक प्रकाशित, तरंगती वस्तू आढाळली. कोल्हापूरी लोकांनी मीम्सच्या माध्यमातून या तथाकथित तबकडीची मजाही लुटली. वर्तमान पत्रांमध्येही ही उडती तबकडी म्हणजे UFO असावी असा अंदाज व्यक्त करण्यात आला. त्यामुळे कोल्हापुरात आता परग्रहवासी म्हणजे एलियन्स दिसणार का, अशी मजेशीर चर्चाही रंगली.
 
शेवटी शिवाजी विद्यापीठाच्या एका अभ्यास गटाने हवेत तरंगणारी गोष्ट म्हणजे हवामान खात्याने सोडलेला एक फुगा होता, हे स्पष्ट केल्यावर सगळ्या चर्चा थांबल्या.
 
पण, कोल्हापूरपासून तेरा हजार किलोमीटर दूर अमेरिकेतही अगदी याचवेळी UFO वर चर्चा सुरू होती आणि आहे. तिथं तर एका अभ्यास गटाला उडत्या तबकड्या अस्तित्वात आहेत की नाही याचा रितसर अभ्यास करायला सांगण्यात आलंय.
 
UFO हा म्हणूनच कुतुहलाचा विषय ठरतोय. तेव्हा आज जाणून घेऊया UFO बद्दल आपल्याकडे असलेली शास्त्रीय माहिती आणि त्याचबरोबर लोकांमध्ये असलेले समज…
 
उडती तबकडी किंवा UFO म्हणजे काय?
विज्ञानाच्या मदतीने आपण आपली सृष्टी आणि विश्व यातल्या कितीतरी गोष्टी समजून घेतो, त्यांची उकल करून घेतो. पण, तरीही आजूबाजूला आपल्यासाठी कित्येक नवीन किंवा अनाकलनीय घटना घडतच असतात.
 
त्याविषयीचं गूढ आपल्या मनात कायम राहतं. आकाशात कधी कधी दिसणाऱ्या स्वयंप्रकाशित पांढऱ्या तबकड्या हा यातलाच प्रकार आहे. म्हणूनच त्याला शास्त्रज्ञांनी नावही दिलंय UFO म्हणजे अनआयडेंटिफाईड फ्लायिंग ऑबजेक्ट. आपण मराठीत तिला म्हणतो उडती तबकडी…
 
आपल्या पृथ्वीच्या पलीकडे विश्वात इतरही ग्रह आहेत हे विज्ञानाने सिद्ध केलंय. त्यावर जीवसृष्टी असू शकेल अशी शक्यताही व्यक्त केलीय.
 
पण, ही जीवसृष्टी नेमकी कशी आहे, तिथं आपल्यासारखी माणसं आहेत का, हे विज्ञानालाही सध्या ठाऊक नाही. आणि म्हणूनच अशा गूढ गोष्टींबद्दल माणसाचं कुतुहल नेहमीच ताणलेलं असतं.
 
बॉलिवूड आणि हॉलिवूडमध्ये तसंच कार्टून्समध्ये एलियन्स म्हणजे परग्रहवासी आणि असे लोक अवकाशात प्रवासासाठी वापरतात ते यान म्हणजे फ्लायिंग सॉसर किंवा युएफओ यांचं झालेलं चित्रण हे या गूढाभोवतीच फिरतं.
 
वैज्ञानिक दृष्ट्या पृथ्वीबाहेरच्या जगाचा अभ्यास तर सुरू आहेच. पण, युएफओवर वेगळं संशोधन करण्याची गरज अलीकडे अमेरिकेला भासली.
 
याचं कारण, 2004 मध्ये प्रशांत महासागरावरून उड्डाण करणाऱ्या एका अमेरिकन वायूदलाच्या पायलटला अवकाशात एक प्रकाशमान तुकडा हवेत फिरताना दिसला. हा तुकडा कुठला याचा अर्थ शास्त्रज्ञांनाही लावता आला नाही.
 
तर 10 मे ला अमेरिकन नेव्हीनं एका विमानाच्या बाजूने जाणाऱ्या एका गूढ तुकड्याचं चक्क चित्रण केलं. यावेळी टीव्हीवर लोकांनी हा चमकणारा तुकडा पाहिला. अशा विरळ पण, ठोस घटना जगभर घडत आलेल्या आहेत.
 
काहीवेळा शास्त्रज्ञांना त्याचा अर्थ लागतो, काहीवेळा नाही. पण, अलीकडे आकाशात विमानांच्या मार्गामध्ये अडथळा आल्याच्याही घटना घडल्यात.
 
त्यानंतर मात्र अमेरिकेत सैन्यदलाच्या मदतीने याचा रीतसर अभ्यास सुरू झाला. हेच ते संशोधन जे गेल्याच आठवड्यात अमेरिकन संसदेच्या एका मंडळासमोर मांडण्यात आलं.
 
या संशोधनाचा हेतू हे गूढ चमकणारे तुकडे कसले आहेत हे शोधण्याबरोबरच अमेरिकन राष्ट्रीय सुरक्षेला तर धोका नाहीए ना हा ही होता. या अहवालातून काही गोष्टी बाहेर आल्या आहेत त्या बघूया…
 
उडत्या तबकड्यांबद्दल आपल्याला काय माहीत आहे?
पेन्टागॉनचे एक गुप्तचर अधिकारी रोनाल्ड मॉल्ट्री यांनी हा अहवाल मांडताना सुरुवात अशी केलीय की, काहींचा अपवाद वगळता बहुतेक सर्व UAP चा छडा लावण्यात आम्हाला यश आलंय.
 
यात UAP म्हणजे अनएक्सप्लेन्ड एरियल फेनोमेना… अवकाशातल्या अर्थ न उलगडलेल्या घटना… आपण ज्यांना युएफओ म्हणतोय त्याच या गोष्टी आहेत. पुढे मॉल्ट्री यांच्या टीमने सादर केलेल्या अहवालात म्हटलंय की,
 
"आम्ही यापूर्वी नोंद घेतलेल्या प्रत्येक घटनेचा स्वतंत्र अभ्यास केला. आणि प्रत्येक घटना समजून घेऊन तिचा अर्थ लावण्याचा प्रयत्न केला. प्रत्येक घटनेला वेगळं करून त्याची वैशिष्ट्यं तपासून आणि गरज पडली तर परिणाम सौम्य करण्यासाठी अभ्यास केला."
 
संशोधन काय सांगतं?
 
या सगळ्या अभ्यासाचा निष्कर्ष मांडताना संशोधकांनी प्रत्येक घटनेबद्दल भाष्य केलं आहे. पण, मनातल्या प्रश्नासाठीचं उत्तर एका वाक्यात द्यायचं झालं तर असं आहे,
 
"आम्हाला असा कुठलाही पुरावा आढळला नाही, जिथे उडत्या वस्तूची निर्मिती ही पृथ्वी किंवा तिच्या वातावरणाच्या बाहेर झाली असावी."
 
अमेरिकन संशोधकांनी आधीच स्पष्ट केलंय की, काही घटनांचा उलगडा त्यांना करता आला काहींचा नाही. पण, चमकणाऱ्या वस्तू, उडणाऱ्या तबकड्या अशा घटनांचं अप्रूप आपल्याला खूप पूर्वीपासून होतं.
 
अगदी 1950 च्या दशकापासून चमकत्या किंवा उडत्या तबकड्यांच्या घटना फक्त अमेरिकाच नाही तर जगभर घडत आल्या आहेत. खगोल आणि अवकाश शास्त्रज्ञांनी त्यांचा अर्थ लावण्याचा प्रयत्नही केला आहे. अशा घटनांच्या अनुभवातून काही निष्कर्ष काढण्यात आले आहेत.
 
कथित UFO खाली गोष्टी असण्याची शक्यता आहे.
 
* अवकाशातील एखादा घटक. उदा. उल्का, धुमकेतू, दुरून दिसणारा चंद्र, प्रखर तारा
* विमान किंवा अवकाश यान (त्यांचे अवशेष) - आकाशात एखादं विमान, लढाऊ विमान खूप उंचावरून उडत असेल. किंवा काही वेळा अवकाशातल्या यानाचा एखादा तुकडा पृथ्वीवर पडत असेल.
* फुगे - जे हवामान आणि इतर अनेक प्रकारच्या संशोधनात वापरले जातात.
* वातावरणातील बदल - जसं वीजा, ढगांना येणारी झळाळी, वेगळ्या प्रकारचे पक्षी.
* प्रकाश - अवकाशातून झिरपणारा प्रकाश जसं की मृगजळ, उपग्रहातून कधी कधी येणारा प्रकाश.
* मानसिक आजार - काहीवेळा भास किंवा फसव्या आठवणीतून लोकांची अशी कल्पना होते की, उडती तबकडी त्यांनी पाहिली आहे.
* अफवा - काहीवेळा लोकांना याबद्दल असलेलं कुतुहल बघता अशा अफवाही पसरवल्या जातात.
 
थोडक्यात, उडत्या तबकड्यांच्या अस्तित्वाबद्दल अजून कुठलाही शास्त्रीय पुरावा मिळालेला नाही. आतापर्यंत ज्या घटना समोर आल्या त्यातल्या किमान 90 टक्के घटनांचा अर्थ संशोधकांनी वर दिलेल्या एखाद्या स्पष्टीकरणातून सांगितला आहे.
 
पण, यामुळे त्यांच्या विषयीचं कुतुहल किंवा अधिक अभ्यास थांबणार आहे असं नक्कीच नाही. सध्या आपण त्यांना अनाकलनीय उडती वस्तू म्हणतो तेच सध्या कायम राहणार आहे.
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

क्षमा बिंदू कोण आहे? ती स्वत:शीच लग्न का करतेय?