सार्वजनिक बांधकाम विभागातील कार्यकारी अभियंता सतीश चिखलीकर व शाखा अभियंता जगदीश वाघ यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लाच स्विकारल्याप्रकरणी २०१३ साली सापळा रचून अटक केली होती. या प्रकरणाचा तपास सुरु असतांना चिखलीकर यांच्या नावे राज्यातील विविध शहरात, बँकेत कोट्यवधींची मालमत्ता आढळली होती. हे प्रकरण यामुळे पूर्ण राज्यात खूप गाजले होते. चिखलीकर यांच्यावार अपसंपदेचा गुन्हाही नोंदविला गेला. आता नाशिकच्या जिल्ह्य न्यायालयात लाचेच्या गुन्ह्यात सुनावणी पूर्ण झाली असून, जिल्हा व सत्र न्यायाधीश एन.जी.गिमेकर यांच्या न्यायालयात निकालाची सुनावणी करत या दोघांना गुन्ह्यात ठोस पुरावा सिध्द न झाल्याने निर्दोष मुक्तता केली आहे. सोबतच दुसऱ्या पक्षाला पुढील न्यायलयात जाता येणार असून असे नमूद करत चिखलीकर व वाघ यांना १५ हजाराच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला आहे.
तक्रारदार ठेकेदाराचे ३ लाख ६९ हजार रुपयांच्या बिलाची रक्कम मंजूर करण्यासाठी, चिखलीकर आणि वाघ यांनी ठेकेदाराकडे २२ हजार रु. मागितले होते. ठेकेदाराने याबद्दल लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली, त्यानुसार नाशिक विभागाच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ३० एप्रिल २०१३ रोजी सापळा रचला आणि या दोघांना ही लाच स्विकारताना दोघांना पकडले. या गंभीर उच्च अधिकारी लाचखोर प्रकरणी दोघांविरोधात गुन्हा नोंदवला होता.