दक्षिण-पूर्व अरबी समुद्र, मालदीव, लक्षद्वीपवर चक्रिय स्थिती निर्माण झाल्याने तेथून पूर्व-मध्य अरबी समुद्रात द्रोणीय स्थिती तयार झाली आहे. त्यामुळे येत्या 24 तासात दक्षिण-पूर्व अरबी समुद्र, मालदीव, लक्षद्वीपमध्ये कमी दाबाच्या क्षेत्राची शक्यता निर्माण झाली आहे. तसे हवामान विभागाने सूचित केले आहे. त्याचा परिणाम राज्याच्या अनेक जिल्ह्यांवर होणार आहे. त्यामुळेच कोकण, उत्तर व मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
मध्यप्रदेशात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी अथवा ढग फुटी होऊन तापी नदीपात्रातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा प्रवाह होऊ शकतो. त्यामुळे तापी नदी तसेच उप नद्यांमध्ये पूर सदृश्य परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. परिणामी, नदीकाठच्या गावातील तसेच आसपासच्या गावांच्या नागरिकांनी सतर्कता बाळगावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
वादळीवारा (ताशी 30 ते 40 कि.मी ), विजांच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतीमालाचे नुकसान टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी आपला शेतमाल सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवावा. बाजार समितीमध्ये शेतमाल विक्रीसाठी आणला असेल किंवा त्याप्रमाणे नियोजन केले असेल, तर मालाचे नुकसान होणार नाही अशी काळजी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
विजा, गारांपासून बचावासाठी सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा. मोकळे मैदान, झाडाखाली, वीज वाहिनी अथवा ट्रॉन्सफॉर्मजवळ थांबू नये, वादळी वारे पासुन संरक्षणासाठी भाजीपाला, मिरची, पपई,केळी इत्यादी पिकांना आधार देण्याची व्यवस्था करावी. पक्वता अवस्थेत असलेल्या पिकांची काढणी करुन सुरक्षित ठिकाणे ठेवावीत, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.