संभाजी भिडे यांनी मंत्रालयात जात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सदिच्छा भेट घेतली. त्या भेटीनंतर भिडे यांनी पत्रकारांशी संवाद साधला त्यात ते बोलत होते. विशेष म्हणजे मंत्रालयातून बाहेर पडत असताना एका महिला पत्रकाराला भिडेंनी कुंकू लावण्याचा सल्लाही दिला. संभाजी भिडेंना मंत्रालयात महिला पत्रकाराने प्रश्न विचारला. त्यावर, तू टिकली लाव. आमची अशी भावना आहे, प्रत्येक स्त्री ही भारतमातेचं रुप आहे, अन् आमची भारतमाता विधवा नाही. तू आधी कुंकू लाव मग तुझ्याशी बोलतो, असे म्हणत संभाजी भिडे यांनी महिला पत्रकाराला परखड सल्ला दिला.
संभाजी भिडे (Sambhaji Bhide) मंत्रालयात मुख्यमंत्र्यांना भेटायला आले होते, त्यावेळी एका महिला पत्रकाराने प्रश्न विचारण्यासाठी हातातील बूम भिडेंसमोर केला होता. त्यावेळी, संभाजी भिडेंनी आपल्या मनातील भावना अशा व्यक्त केल्या. यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे (NCP Supriya Sule) यांनीही संभाजी भिडे यांच्यावर निशाणा साधला आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून हेरंब कुलकर्णी यांची कविता शेअर केली आहे.
"तू आणि मी ....
मी लावतो टिळा
तू लाव टिकली
परंपरेच्या बाजारात
अक्कल आम्ही विकली
मी लावतो भस्म
तू लाव कुंकू
गुलामीचा शंख
दोघे मिळून फुंकू
तू घाल मंगळसूत्र
मी घालतो माळ
मनूने मारलेली रेषा
मनोभावे पाळ
तू घाल बांगड्या
माझ्या हातात गंडा
मुकाट्याने ऐक नाहीतर
आमच्या हातात दंडा
मी घालतो मोजडी
तू जोडवे घाल
सप्तपदी च्या मर्यादेत
जन्मभर चाल
तू घाल अंबाडा
मी शेंडी राखतो
विज्ञानाच्या प्रगतीला
परंपरेने झाकतो
मी घालतो टोपी
तू घाल बुरखा
बायकांच्या गुलामीवर दोन्हीकडे
एकमत आहे बर का...!!!
मी धोतरात, तू शालूत
होऊ परंपरेचे दास
साने गुरुजी ते भिडे गुरुजी
महाराष्ट्राचा प्रवास .....!!!!!
- हेरंब कुलकर्णी"
"शिवसेना-भाजपा व्यक्तिगत स्वार्थासाठी वाईट करणार नाही"
Edited by : Ratnadeep Ranshoor