राज्यात गेल्या आठवड्यापासून अवकाळी पाऊस सुरु आहे. अनेक जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे उकाड्यापासून नागरिकांना दिलासा मिळाला आहे. मंगळवारी पुणे, पिंपरी, चिंचवड भागात मुसळधार पावसाचा धुमाकूळ सुरु होता. हवामान खात्यानं मराठवाडा आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. तर मुंबई आणि कोकणात तापमानात वाढ होणार असून उन्हाचा पारा चढणार आहे. राज्यात अनेक जिल्ह्यात पाऊस तर काही जिल्ह्यात कडक ऊन पाहायला मिळत आहे.
हवामान खात्यानं येत्या 48 तासात परभणी, छत्रपती संभाजी नगर, नांदेड, हिंगोली, उस्मानाबाद जिल्ह्यात अवकाळी पावसाची शक्यता वर्तवली असून या भागात यलो अलर्ट जारी केलं आहे. तर यवतमाळ, बुलढाणा, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, नागपूर, उत्तर महाराष्ट्रातील जळगाव, धुळे, नंदुरबार, नाशिक जिल्ह्यात पावसाची शक्यता वर्तवली असून पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर, पुणे, सातारा आणि कोल्हापूर या जिल्ह्यात ढगाळ वातावरण असणार.
मुंबई आणि कोकणातील काही भागात रायगड, सिंधुदुर्ग, अलिबाग, रत्नागिरी, तापमानात वाढ होण्याची शक्यता वर्तवली आहे. मान्सून अंदमान मध्ये दाखल झाला असून येत्या काही दिवसांत मान्सून महाराष्ट्रात केरळमार्गे दाखल होणार आहे.