सहा जिल्ह्याला एकच पालकमंत्री दिला आहे. हा पालकमंत्री काय स्पायडरमॅन आहे का? सहा जिल्ह्याच्या विकास कामांसाठी ते वेळ कसा देणार? या दोघांच्या वादात जिल्ह्यातील विकासकामांचा बोजवारा उडाला आहे. आधीच या सरकारने मंजूर विकास कामांना स्थगिती दिलेली आहे, अशी टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.
यासंदर्भात पत्रकारांशी बोलताना नाना पटोले पुढे म्हणाले की, राज्यातील शिंदे-फडणवीस सरकार हे दिल्लीच्या इशाऱ्यावर काम करत आहे, दिल्लीला विचारल्याशिवाय ते कोणताच निर्णय घेऊ शकत नाहीत. त्यामुळे सारख्या दिल्ली वाऱ्या कराव्या लागतात हे महाराष्ट्राचे दुर्दैव आहे. राज्यातील ईडीचे सरकार असंवैधानिक आहे हे आम्ही सुरुवातीपासूनच सांगत आहोत. दुसरीकडे महागाईने जनता त्रस्त आहे. मध्यमवर्गही महागाईने पिचला आहे पण केंद्र सरकार आपली जबाबदारी झटकत आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमण या महागाई राज्य सरकारने कमी करावी असे म्हणत आहेत.