Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मुख्यमंत्री बदलाची चर्चा होत असताना पडद्यामागे काय घडत होतं?

eknath shinde
, मंगळवार, 25 जुलै 2023 (21:44 IST)
प्राजक्ता पोळ
22 जुलै … अजित पवार आणि देवेंद्र फडणवीसांचा वाढदिवस … त्या दिवशी शनिवार असल्यामुळे अधिवेशनाला नेमकी सुट्टी. त्यामुळे या दोघांच्या केमिस्ट्रीबद्दलची सभागृहातली राजकीय फटकेबाजी हुकली. मग काय मुख्यमंत्र्यांनी आपल्या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना एक दिवस आधीच शुभेच्छा दिल्या. शुभेच्छा दिल्या पण ‘रिटर्न गिफ्ट’चं काय?
 
वाढदिवसाचा दिवस उजाडला. दोन्ही उपमुख्यमंत्र्यांवर शुभेच्छांचा वर्षाव झाला. राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी तर ‘मी अजित अनंत पवार … मुख्यमंत्री पदाची शपथ घेतो की…’ असं ट्विट केलं. मग अजितदादांचे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आला. पुण्यात, मुंबईत अजित पवारांचे भावी मुख्यमंत्री असे होर्डींगस् लागले. एकनाथ शिंदे हे लवकरच मुख्यमंत्री पदावरून जाणार आणि खुर्चीवर अजित पवार विराजमान होणार अशी चर्चा दोन दिवस राजकीय वर्तुळात रंगली.
 
सुट्टीचे दोन दिवस आमदारांचा वेळ एकमेकांना फोनाफोनी करण्यात गेला. राष्ट्रवादीचे आमदार ‘दादा’ आपले मुख्यमंत्री होणार म्हणून कमालीचे खूश होते. तर भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेत एक अस्वस्थता पसरली होती. काहींना पहिल्यांदाच स्वतः चं मंत्री पद सोडून मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीची चिंता वाटू वागली.
 
मुख्यमंत्री थेट दिल्ली दरबारी…!
तितक्यात मुख्यमंत्री दिल्लीला निघाल्याची बातमी धडकली. मुख्यमंत्र्यांना अजित पवारांसाठी खुर्ची सोडावी लागेल हे सांगण्यासाठी दिल्लीला बोलावलं, तुम्हीच मुख्यमंत्री राहणार हे सांगण्यासाठी दिल्लीला बोलावलं असे तर्कवितर्क लावायला सुरवात झाली.
 
मुख्यमंत्र्यांचे सहकुटुंब अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटल्याचे फोटो ट्विटरवर झळकू लागले. हा निरोप समारंभ आहे. एनडीएच्या बैठकीत भेटल्यावर परत सहकुटुंब भेटण्यामागे काय कारण होतं? काहीतरी गडबड सुरू आहे हा तर्क काही केल्या राजकीय वर्तुळातल्या लोकांच्या मनातून जात नव्हता.
 
मुख्यमंत्री लवकरच राजीनामा देतील यासाठी पत्रकार , आमदारांची यंत्रणा अलर्ट झाली. अधिवेशनातच राजीनामा देतात का? की अधिवेशनानंतर?, हे शेवटचं अधिवेशन आहे का? हे प्रश्न समोर येऊ लागले.
 
शनिवारचा दिवस या प्रश्नांसह संपला. पण रविवारी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं कष्टाळू आणि नम्र म्हणत मराठीत ट्विट केलं. मग काय या चर्चेवर पडदा पडला असं म्हणत शिवसेनेच्या आमदारांकडून सुस्कारा टाकण्यात आला.
 
पण आमचे दादाचं मुख्यमंत्री होणार हा आत्मविश्वास राष्ट्रवादीच्या आमदारांमध्ये कायम होता. सोमवारी अधिवेशनाचा दुसरा आठवडा सुरू झाला. मागच्या दोन दिवसांत काहीच झालं नाही अश्या अविर्भात सगळे वावरत होते. अजित पवार नेहमीसारखे सभागृहात येऊन कामकाजात सहभागी झाले. माध्यमांमधल्या मुख्यमंत्री बदलाच्या बातम्याही मागे पडल्या होत्या. नव्याने निधी वाटपाच्या बातम्या सुरू होत्या.
 
अजित पवारांनी स्वत: च्या आमदारांना कोट्यवधींचा निधी पुरवणी मागण्यामधून दिला. त्यावर अधिवेशनातल्या मिडीया स्टॅंडजवळ येऊन बाईट देऊ लागले. आज नवा विषय नवी बातमी…. पुरवणी मागण्यांवर सभागृहात चर्चा सुरू झाली. अजित पवारांनी वित्त मंत्री झाल्यापासून निधी वाटपात कसा अन्याय केला असे आरोप राहीलेले विरोधक करत होते. राहीलेले यासाठी म्हटलं, कारण उरलेली राष्ट्रवादी कोणाच्या गटात जायचं? या संभ्रमामुळे सभागृहात नियमित उपस्थित राहत नाही. कोण कोणाच्या बाजूने आहे? याचा अंदाज लावणं सध्याच्या परिस्थितीत कठीण आहे. असो..
 
अजित पवार मुख्यमंत्र्यांचं कौतुक हेडफोन लावून ऐकू लागले आणि …
पुरवणी मागण्यांच्या चर्चेतून समोर बसलेल्या नवे वित्त मंत्री अजित पवारांना कॉंग्रेसचे नेते टोमणे मारत होते. राजकीय टोलेबाजी सुरू होती. तितक्यात मंत्री शंभूराज देसाई सभागृहात आले. एक निवेदन करायचं आहे अशी विनंती त्यांनी अध्यक्षांना केली. अजित पवार सभागृहात बसलेले असताना शिवसेनेचे मंत्री शंभूराज देसाई यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं कौतुकास्पद निवेदन वाचण्यास सुरूवात केली.
 
ते म्हणाले, “काल पंतप्रधान मोदींनी मराठीत ट्विट करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं कौतुक केलं. ही आमच्या मंत्रीमंडळासाठी अभिमानास्पद आहे. आम्ही सगळे पंतप्रधानांचे आभार मानतो. बाळासाहेब ठाकरे म्हणायचे मला घरात बसणारा नाही तर बाहेर पडून लोकांची कामं करणारा कार्यकर्ता हवा आहे. तसंच काम मुख्यमंत्र्यांनी केलं आहे.” हे ऐकत असताना अजित पवार हेडफोन लावून शांतपणे ऐकत होते.
 
राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या गटातील मंत्रीही शांतपणे ऐकत होते. भाजप नेत्यांच्या चेहऱ्यावर हसू होतं. मंत्री सुधीर मुनगंटीवार आणि भाजप आमदार बाक वाजवून शंभूराज यांना समर्थन देत होते. समोर बसलेले विरोधी पक्षाच्या आमदारांपैकी अशोक चव्हाण , बाळासाहेब थोरात, विजय वडेट्टीवार शंभूराज देसाईंकडे बघून हसत होते. हसत हसत राष्ट्रवादीच्या आमदारांना डिवचत होते.
 
अध्यक्षांच्या चेहऱ्यावरही हसू होते. विजय वडेट्टीवार खाली बसून काहीतरी बोलत असताना अध्यक्ष म्हणाले, “वडेट्टीवार जी निवेदन सुरू आहे. माझं काम तुम्ही करू नका. शांत बसा.” पत्रकार गॅलरीतही मुख्यमंत्र्यांच्या अभिनंदनाच्या निवेदनावर चर्चा सुरू होती. पत्रकार राष्ट्रवादीच्या आमदारांच्या चेहऱ्यावरचे भाव पाहत होते. त्याबाबत कुजकुजत होते. हा अजित पवारांसाठी मेसेज आहे. तर कोणी समारोपाचं निवेदन असल्याचं आपआपल्या पध्दतीने अर्थ लावत होते.
 
पुन्हा मुख्यमंत्री बदलाच्या बातमीची ठिणगी ?
सभागृहात हे घडत असताना बाहेरही या बातमीच्या ठिणग्या पडत होत्या. कॉंग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलं, “सरकारमध्ये कोणाची गरज नसताना भाजपने अजित पवारांना घेऊन जुगार खेळला आहे. लोकसभेसाठी अजित पवारांना मुख्यमंत्री करण्याचाही जुगार भाजप खेळू शकतं. माझ्या माहितीनुसार, एकनाथ शिंदे हे चांगले मुख्यमंत्री असले तरी ठाणे जिल्ह्याच्या पलिकडे त्यांचा फार प्रभाव नाही. त्यामुळे लोकसभेसाठी ते अजित पवारांना मुख्यमंत्री करू शकतात. 10 अॉगस्टनंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बदलणार. सन्मानाने त्यांना जायला सांगणार…”
 
पृथ्वीराज चव्हाणांच्या या वक्तव्यानंतर माध्यमांमध्ये मागे पडलेली बातमी पुन्हा ब्रेकींगच्या स्वरूपात झळकू लागली. पृथ्वीराज चव्हाणांना माध्यमांनी गराडा घातला. शिवसेनेचे आमदार त्याची सारवासारव करू लागले. पृथ्वीराज चव्हाणांवर टीका करू लागले. तिकडे अजित पवारांच्या कार्यालयात हे कधी ना कधी होणार आहे असं काही लोक पुन्हा सांगू लागले. तर दुसरीकडे भाजपचे काही जेष्ठ नेते ज्या आमदारांनी अजित पवार लवकरच मुख्यमंत्री होणार असे ट्विट केले त्यांना फैलावर घेतलं असल्याचं सांगत होते.
 
काहीवेळाने मुख्यमंत्री विधानभवनातून बाहेर पडू लागले. तुम्हाला 10 अॉगस्टला बदलणार असं चव्हाण म्हणतायेत असा प्रश्न विचारला. मुख्यमंत्री हा प्रश्न टाळून पुढे निघून गेले. यातून राजकीय अर्थ , तर्कवितर्क लावले जात असताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मिडीया स्टॅन्डवर येऊन म्हणाले, “मुख्यमंत्री बदणार नाहीत. 2024 च्या निवडणूका एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात होणार आहेत. 10 अॉगस्टला काहीही होणार नाही. त्याच्या आधी नंतर काहीही होणार नाही. झालाच तर आमचा विस्तार होईल. “ हे सांगून फडणवीसांनी मुख्यमंत्री बदलाच्या बातमीवर तात्पुरता का होईना पडदा टाकला.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Pune News सहायक पोलीस आयुक्ताकडून पुण्यात पत्नी आणि पुतण्याचा गोळी झाडून खून, स्वत:ही केली आत्महत्या