शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे राज्यातील दुष्काळी भागाचा दौरा करत आहेत. तर दुसरीकडे हिंगोली जिल्ह्यातील कर्जबाजारी शेतकरी नामदेव पतंगे अचानक मुंबई येथील शिवसेना भवनात दाखल झाले होते. तेव्हा शिवसेना नेते युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांची त्यांनी भेट घेतली व अडचण समजाऊन घेतली. नामदेव पतंगे यांची आर्थिक परिस्थिती ऐकल्यानंतर आदित्य ठाकरे यांनी लगेच त्यांच्या कर्जाची जबाबदारी उचलली, त्यामुळे आता येत्या सोमवारी आरटीजीएसच्या माध्यमातून त्यांच्या कर्जाच्या रकमेची परतफेड होणार आहे. शिवसेनेचे खासदार, सचिव अनिल देसाई आणि माजी आमदार अरविंद नेरकर यांनी नामदेव पतंगे यांची आदित्य ठाकरे यांच्याशी भेट करवून दिली आहे. कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या पतंगे यांनी आदित्य ठाकरे आणि शिवसेनेचे आभार मानले आहेत. त्यामुळे पतंगे खुश आहेत की त्यांचे कर्ज आता भरले जाणार आहे.