Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

HSC Result: बारावी परीक्षेच्या निकालाचा फॉर्म्युला कधी जाहीर होणार?

Webdunia
गुरूवार, 24 जून 2021 (14:48 IST)
- दीपाली जगताप
केंद्राच्या सीबीएसई बोर्डाने बारावी परीक्षेसाठी कोणती मूल्यांकन पद्धत असेल हे जाहीर केलं आहे मात्र राज्याच्या एचएससी बोर्डाने मूल्यांकन पद्धत जाहीर केली नाही. त्यामुळे बारावीच्या अंदाजे 14 लाख विद्यार्थ्यांचा जीव टांगणीला आहे.
 
"अकरावी आणि बारावीत अनेक महाविद्यालयांनी परीक्षाच घेतलेल्या नाहीत. माझ्या कॉलेजमध्ये बारावीत एकही परीक्षा झालेली नाही. अंतर्गत परीक्षांसाठी आता धावपळ सुरू आहे. काही कॉलेजमध्ये ऑनलाईन परीक्षा किंवा असाईनमेंट्स देऊन विद्यार्थ्यांना गुण दिले जात आहेत. तेव्हा बारावीचे अंतिम मूल्यमापन करताना असे गुण ग्राह्य धरणार का?" असा प्रश्न एचएससी बोर्डाची विद्यार्थिनी सुजाता अंगराखे हीने बीबीसी मराठीशी बोलताना उपस्थित केला.
 
हा प्रश्न केवळ एका विद्यार्थ्याचा नाही. राज्यातील बारावीच्या लाखो विद्यार्थ्यांमध्ये निकालासंदर्भात गोंधळाचे वातावरण आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बारावीची परीक्षा रद्द करण्यात आली आणि गुण कसे द्यायचे? असा प्रश्न उभा राहिला.
 
सीबीएसई बोर्डाने बारावीच्या विद्यार्थ्यांचे मूल्यमापन 30:30:40 (दहावी, अकरावी आणि बारावी) या फॉर्म्युल्यानुसार होणार असल्याचं सांगितलं आहे.
 
सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा या सूत्राला मान्यता दिली आहे. त्यामुळे आता एचएससी बोर्ड सुद्धा याच मूल्यांकन पद्धतीनुसार निकाल जाहीर करणार का? याकडे 14 लाख विद्यार्थी आणि पालकांचे लक्ष आहे.
 
बारावीच्या परीक्षा रद्द झाल्याने यंदा विद्यार्थ्यांना गुण कसे द्यायचे? याची पद्धती ठरवण्यासाठी शैक्षणिक मंडळांना बरीच मेहनत घ्यावी लागतेय. उच्च शिक्षणासाठी प्रवेश घेत असताना सर्व बोर्डाच्या विद्यार्थ्यांचे मूल्यमापन एकसमान पद्धतीने करण्याचे आव्हान शिक्षण मंडळांसमोर आहे.
 
एचएससी बोर्डाकडून अद्याप कोणतीही मूल्यमापन पद्धती निश्चित करण्यात आलेली नाही. पण काही मोजक्या फॉर्म्युल्यांवर शिक्षण विभाग विचार करत असल्याचे समजते.
 
सद्यपरिस्थितीत एचएससी बोर्ड काही मोजक्या पर्यायांचा विचार करत आहे. हे पर्याय कोणते आहेत? एचएससी बोर्डाच्या विद्यार्थ्यांना गुण देण्याचे निकष कोणते असू शकतील?
 
यासंदर्भात महाविद्यालयांची भूमिका काय आहे? आणि महाविद्यालयीन प्रवेश बारावीच्या या निकालाच्या आधारे होतील की त्यासाठी वेगळी परीक्षा घेण्यात येईल? अशा सर्व प्रश्नांचा आढावा आपण या बातमीत घेणार आहोत.
 
HSC निकालासाठी 30:30:40 फॉर्म्युला की 60:40 फॉर्म्युला?
सुरुवातीला पाहुया, 30:30:40 ही मूल्यमापन पद्धती कशी आहे? सीबीएसई बोर्डाने सर्वोच्च न्यायालयात हा फॉर्म्युला सादर केला. त्यानुसार, यंदा परीक्षा न झाल्याने बारावीच्या विद्यार्थ्यांना दहावी, अकरावी आणि बारावीच्या गुणांच्या आधारे अंतिम निकाल देण्यात येणार आहे.
 
यात दहावीचे 30 टक्के गुण, अकरावीचे 30 टक्के गुण आणि बारावीच्या वर्षभरात झालेल्या परीक्षांचे 40 टक्के गुण यानुसार विद्यार्थ्यांची अंतिम टक्केवारी ठरवली जाणार आहे.
 
दहावी आणि अकरावी या दोन इयत्तेत वार्षिक परीक्षेत विद्यार्थ्यांना ज्या तीन विषयांत सर्वाधिक गुण मिळाले आहेत त्याचा समावेश करण्यात येईल असं सुद्धा स्पष्ट करण्यात आलं आहे. तसंच बारावीच्या वर्षातील युनिट टेस्ट, टर्म आणि प्रात्यक्षिक परीक्षांमध्ये मिळालेले गुण ग्राह्य धरले जातील.
 
यासाठी प्रत्येक शाळेत मूल्यांकन समिती गठित करण्याची सूचना सीबीएसई बोर्डाने शाळांना केली आहे.
 
महत्त्वाचे म्हणजे सीबीएसई बोर्डाचा हा फॉर्म्युला सर्वोच्च न्यायालयाने मान्य केल्याने त्यांच्या कायदेशीर अडचणी दूर झाल्या आहेत. म्हणूनच एचएससी बोर्ड सुद्धा हीच पद्धत निश्चित करेल अशी शक्यता वर्तवली जात आहे. कारण सर्वोच्च न्यायालयाने ही पद्धत स्वीकारल्याने एचएससी बोर्डाचा कायदेशीर मार्ग सुकर होऊ शकतो.
 
यासंदर्भात शिक्षण विभागाकडून गेल्या काही दिवसांत सलग बैठका घेण्यात येत आहेत. याबैठकीत विविध कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य, प्राध्यापक संघटनेचे प्रतिनिधी, शिक्षणतज्ज्ञ आणि शिक्षणाधिकाऱ्यांचा सहभाग आहे.
 
नाव जाहीर न करण्याच्या अटीवर बैठकीत सहभागी झालेल्या एका प्राध्यापकांनी सांगितलं, "सीबीएसईप्रमाणे एचएससी बोर्ड सुद्धा दहावीचे गुण ग्राह्य धरेल की नाही हे आताच सांगता येणार नाही. कारण बारावीच्या निकालासाठी दहावीचे गुण ग्राह्य धरायचे की नाही याबाबत शिक्षण विभागात दुमत आहे. अनेकांचे असे मत आहे की केवळ अकरावी आणि बारावीच्या गुणांच्या आधारेच बारावीचा निकाल जाहीर करण्यात यावा."
 
"यासाठी अकरावीचे 60 टक्के गुण आणि बारावीचे 40 टक्के गुण अशा फॉर्म्युल्यावर विचार सुरू आहे," असंही त्यांनी सांगितलं.
 
एचएससी बोर्डाने मात्र सध्या कोणताही फॉर्म्युला ठरला नसल्याचे स्पष्ट केलं आहे. एचएससी बोर्डाचे अध्यक्ष दिनकर पाटील यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं, "सीबीएसई बोर्डाचं ठरलं असलं तरी अद्याप एचएससी बोर्डाच्या बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी मूल्यमापन पद्धती ठरलेली नाही. यासाठी चर्चा सुरू असून अनेकांनी पर्याय सुचवले आहेत. दहावीचे गुण ग्राह्य धरणार की नाही याबाबत आताच आम्ही काही सांगू शकत नाही."
 
'HSC बोर्डाने वेगळा निर्णय घेतल्यास कायदेशीर आव्हान?'
महाराष्ट्रात बारावीच्या निकाल कसा लावावा, त्यासाठी मूल्यमापन कसे करावे, कोणते निकष लावावेत याबाबत चर्चा सुरू असून महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाने बारावीच्या निकालाचे सूत्र सीबीएसई बोर्डप्रमाणे असावे अशी मागणी केली आहे.
 
बारावीच्या परीक्षा घेण्याबाबत 22 मे रोजी देशभरातील शिक्षणमंत्र्यांच्या बैठकीत राज्य सरकारने बारावीची परिक्षा घेणे अशक्य असल्याचं सांगत देशभरात मूल्यांकनाची एकसमान पध्दत असावी अशी भूमिका मांडली होती.
 
1 जून रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत बारावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला गेला. त्यानंतर 2 जून रोजी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत केंद्र आणि राज्यात सुसूत्रता असावी असे सांगत राज्यातील बारावीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या.
 
आता बारावीचा निकाल कसा लावावा याबद्दल चर्चा होत असताना सीबीएसईचे धोरण राज्यासाठी कायम ठेवले नाही तर राज्याच्या स्वतंत्र निर्णयाला न्यायालयात आव्हान दिले जाऊ शकते अशी शक्यता कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघाने वर्तवली आहे.
 
संघटनेचे प्रमुख मुकुंद अंधळकर यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं, "दहावी, अकरावी आणि बारावी या तिन्ही वर्षांचे विद्यार्थ्यांचे गुण ग्राह्य धरण्यास आमचा पाठिंबा आहे. कारण अकरावी आणि बारावी या दोन्ही वर्षी शाळा बंद असल्याने तसेच कोरोनाची भीती असल्याने अंतर्गत परीक्षा आणि मूल्यमापन मानकांनुसार झालेले नाही. या विद्यार्थ्यांचा दहावीचा निकाल मात्र गुणवत्तापूर्ण आणि पारदर्शी पद्धतीने जाहीर झाला आहे."
 
या कारणांमुळे दहावीचे गुण ग्राह्य धरावेत अशी संघटनेची मागणी आहे. शिवाय, सीबीएसई बोर्डाची मूल्यमापन पद्धती आणि एचएससी बोर्डाची पद्धती एकसमान नसल्यास विद्यार्थी आणि पालकांमध्ये नाराजी उद्भवू शकते असंही ते सांगतात.
 
"तसंच सर्वोच्च न्यायालयाने मान्य केलेल्या फॉर्म्युल्यापेक्षा वेगळा फॉर्म्युला दिल्यास राज्य सरकारच्या निर्णयाला पुन्हा न्यायालयात आव्हान दिले जाऊ शकते." अशी शक्यताही त्यांनी वर्तवली आहे.
 
'दोन वर्षांत कुठल्याच परीक्षा झाल्या नाहीत'
वर्षभर शाळा, महाविद्यालय बंद असल्याने विद्यार्थ्यांना गुणवत्ता शिक्षण मिळाले नाही तसंच मोठ्या संख्येने अकरावी आणि बारावीच्या महाविद्यालयीन स्तरावर होणाऱ्या परीक्षा सुद्धा झालेल्या नाहीत असं विद्यार्थी सांगतात.
 
बोर्डाची विद्यार्थिनी सलोनी कांबळी सांगते, "सीबीएसई बोर्डाशी एचएससी बोर्डाने तुलना करू नये. कारण एचएससी बोर्डाच्या कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये वर्षभर अंतर्गत परीक्षा झाल्या नाहीत. आता मुख्य परीक्षा रद्द झाल्यानंतर महाविद्यालयांमध्ये परीक्षा घेण्याची लगबग सुरू झाली आहे. त्यामुळे नि:पक्षपातीपणे गुण दिले जाणार नाहीत याचीही शक्यता आहे. त्यामुळे मूल्यांकन पद्धती ठरवताना याचा विचार केला पाहिजे."
 
एकाबाजूला एचएससी बोर्ड निर्णय घेण्यास विलंब करत आहे तर दुसऱ्या बाजूला महाविद्यालयांकडून आता परीक्षा घेतल्या जात आहेत असंही विद्यार्थी सांगतात.
 
"काही कॉलेज विद्यार्थ्यांना आता अंतर्गत परीक्षा द्यायला सांगत आहेत. काही ठिकाणी 30 गुणांची ऑनलाईन परीक्षा होत आहे तर काही कॉलेजने असाईनमेंट्स दिल्या आहेत. त्यामुळे सरकारने फॉर्म्युला लवकर ठरवावा जेणेकरून हा गोंधळ होणार नाही," असं सुजाता अंगराखे या विद्यार्थिनीने सांगितलं.
 
महाविद्यालयीन प्रवेशासाठी सीईटी होणार?
बारावीचा निकाल आणि महाविद्यालयीन प्रवेश या दोन गोष्टी दोन वेगळे विभाग सांभाळतात हे विद्यार्थी आणि पालकांनी लक्षात घेतले पाहिजे.
 
बारावीच्या निकालासंदर्भात शालेय शिक्षण विभाग आणि एचएससी बोर्ड निर्णय घेत असते. पण बारावीनंतरचे सर्व प्रवेश, परीक्षा आणि निकाल विद्यापीठ आणि उच्च शिक्षण विभागाअंतर्गत येतात. त्यामुळे बारावीचा निकाल जाहीर झाला तरी पदवी आणि इतर प्रवेश याच निकालाच्या आधारे होतील असं निश्चित सांगता येणार नाही.
 
वैद्यकीय, इंजिनिअरींग, व्यावसायिक अभ्यासक्रम यासाठी स्वतंत्र सीईटी परीक्षा असतात. परंतु यंदा बीए, बीएससी, बीकॉम, बीएमएस, बीएफएफ अशा अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठीही सीईटी घेतली जाऊ शकते.
 
मुंबईतील एका नामांकित महाविद्यालयाच्या वरिष्ठ प्राध्यपकांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं, "पदवी प्रवेशासाठी स्वतंत्र प्रवेश परीक्षा होणं गरजेचं आहे. कारण कनिष्ठ महाविद्यालयांचे मूल्यमापन पारदर्शी असेलच असं नाही. तसंच विद्यार्थ्यांना सरसकट गुण दिले गेले तर प्रवेशासाठी स्पर्धा प्रचंड वाढणार आहे. हे विद्यार्थ्यांसाठीही योग्य ठरणार नाही. शिवाय, महाविद्यालयात उच्च शिक्षणाची गुणवत्ता राखता येणार नाही. त्यामुळे शासन व्यवस्थेने निर्णय घेताना या गोष्टींची खबरदारी घेणं गरजेचं आहे."
 
बारावीत सरसकट सर्व विद्यार्थ्यांना पास करण्याचा निर्णय घेण्यात आला तर प्रवेशावेळी महाविद्यालयांच्या अडचणी वाढणार आहेत. मेरिटनुसारच प्रवेश व्हावेत यासाठी महाविद्यालयं आग्रही आहेत.
 
महाविद्यालयीन प्रवेशासाठी सीईटी घेणार की नाही याबाबत उच्च शिक्षण विभागाकडून कोणतीही बाब स्पष्ट करण्यात आलेली नाही.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Tulsi Vivah 2024: भगवान विष्णूने तुळशीशी लग्न का केले? जाणून घ्या तुळशी विवाहाचे नियम आणि पद्धत

तुळशीच्या रोपाजवळ शिवलिंग किंवा गणेश मूर्ती ठेवावी की नाही?

हे सुपर फूड 35 पेक्षा जास्त वयाच्या महिलांसाठी खूप महत्वाचे असतात

हार्मोनल मुरुमांच्या समस्येने त्रस्त असाल तर हा उपाय अवलंबवा

ओठांवर जास्त लिपस्टिक लावल्याने होऊ शकतात या 3 समस्या, वेळीच सावध व्हा

सर्व पहा

नवीन

IND vs SA: पहिल्या T20 मध्ये नजरा अभिषेक-संजूवर, संभाव्य प्लेइंग11 जाणून घ्या

ठाण्यामध्ये लाखोंचा गुटखा जप्त, एका आरोपीला अटक

एरिगेने चेन्नई ग्रँड मास्टर्समध्ये बुद्धिबळ तिसरी फेरी जिंकली, दुसरे स्थान गाठले

ब्युटीशियनची हत्या करून तिचा मृतदेह लपवल्याच्या आरोपीला मुंबईतून अटक

सांगा धारावीमध्ये काय काम केले-नागपूरमध्ये उद्धव ठाकरेंना एकनाथ शिंदेंनी दिले आव्हान

पुढील लेख
Show comments