कोल्हापूरमधील राधानगरी धरणाच्या दरवाजांचे तांत्रिक काम सुरू असताना एक दरवाजा उघडून अडकल्याची घटना घडली. त्यामुळे मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे. परिणामी नदी काठावरील गावांनी घाबरून न जाण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
कोल्हापूरला पाणी पुरवठा करणारे धरण म्हणून राधानगरी धरणाची ओळख आहे. हे धरण भोगावती नदीवर बांधण्यात आले असून त्याचा उपयोग शेतीच्या पाणी पुरवठ्यासाठी व वीज निर्मितीसाठी होतो. दरम्यान सर्व्हिस गेटचे काम सुरू असताना धरणाचा दरवाजा अडकला. त्यानंतर धरणातून हा पाण्याचा विसर्ग सुरू झाला.
दरम्यान, नदीपात्रात मोठ्या प्रमाणात पाणी सोडले जात असल्याने पंचगंगा नदीमधील पाण्याची पातळी तीन ते चार फुटांनी वाढण्याची शक्यता आहे. त्यापार्श्वभूमीवर नदीकिनारी राहणाऱ्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तसेच ग्रामस्थांनी नदी परिसरात जाऊ नये, घाबरून जाऊ नये असे आवाहन केले आहे.