Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

भरत गोगावले कोण आहेत, ज्यांची प्रतोदपदी निवड सुप्रीम कोर्टानं बेकायदेशीर ठरवलीय...

Webdunia
गुरूवार, 11 मे 2023 (13:41 IST)
- नामदेव काटकर
Who is Bharat Gogawale महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाच्या निकाल वाचनात पहिला सर्वात मोठा धक्का एकनाथ शिंदे गटाला बसला आहे. शिंदे गटानं गुवाहाटीतून निवडलेले पक्ष प्रतोद भरत गोगोवले यांची निवड अवैध ठरवली आहे.
 
सरन्यायाधीश चंद्रचूड निकाल वाचनात म्हणाले की, "विधानसभा अध्यक्षांनी सुनील प्रभू आणि भरत गोगावले यांच्यातील अधिकृत व्हीप कोण, हे शोधलं नाही. त्यांनी स्वत: शोधायला हवं होतं. व्हीप हा पक्षाने नेमलेला पाहिजे. गोगावलेंची व्हीप नेमणं अवैध आहे."
 
याच भरत गोगावलेंबद्दल आपण अधिक जाणून घेणार आहोत.
 
सरपंच ते आमदार
कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या नेत्यांपैकी एक भरत गोगावले आहेत. सरपंच ते आमदार आणि आता शिवसेनेतील बंडखोरी केलेल्या एकनाथ शिंदे गटाचे प्रतोद असा प्रवास भरत गोगावलेंचा आहे.
 
'ढालकाठी (खरवली), पोस्ट - बिरवाडी, तालुका - महाड, जिल्हा - रायगड' असं आता निवडणूक आयोगाच्या लेखी भरत गोगावलेंचा पत्ता असला, तरी महाडमधील दुर्गम भागातील पिंपळवाडी नावाच्या छोट्याशा गावात त्यांचा जन्म झाला.
 
गावातच शालेय शिक्षण सुरू केलेल्या भरत गोगावले तिसरीत नापास झाले. मग पुढे काय, असा प्रश्न पडल्यावर त्यांच्या चुलत्यानं त्यांना मुंबईत आणलं. हा सगळा काळ साठ-सत्तरच्या दशकातला.
 
ते मुंबईत आले आणि पुन्हा शाळेचे उंबरठे चढले.
 
घाटकोपर पूर्वेकडील शिवाजी शिक्षण संस्थेच्या मल्टीपर्पज टेक्निकल हायस्कूलमध्ये त्यांनी तिसरीनंतरचे धडे गिरवायला सुरुवात केली. या शाळेत त्यांनी नववीपर्यंत शिक्षण घेतलं आणि शाळेला राम राम ठोकला. हे वर्ष होतं 1979.
 
मग त्याच वर्षी ते गावी आले आणि शेतीत रमू लागले. पुन्हा शाळेकडे ते वळले नाहीत.
 
राजकारणाची आवड निर्माण झाल्यानंतर पंचक्रोशीतली लहान-मोठी कामं करू लागले. ग्रामपंचायत निवडणुकीत त्यांना आपल्या कामाची पावती मिळवण्याची पहिली संधी मिळाली. ते सरपंच म्हणून बिनविरोध निवडून आले आणि सक्रीय राजकारणाला सुरुवात झाली.
 
खरंतर भरत गोगावलेंना राजकारणाचा कुठलाही वारसा नव्हता. वडील शेतकरी. त्यामुळे शेती नि गावाच्या बाहेर जाणंही फार दुर्मिळ.
 
पुढे 1992 साली पंचायत समिती निवडणूक लढण्याची भरत गोगावलेंची इच्छा होती. तेव्हा काँग्रेसकडे तिकीट त्यांनी मागून पाहिलं. पण काँग्रेसनं तिकीट दिलं नाही, म्हणून अपक्ष लढले आणि जिंकले. त्यानंतर शिवसेनेत प्रवेश केला.
 
तेव्हापासून म्हणजे 1992-93 पासून ते शिवसेनेशी जोडले गेले, ते एकनाथ शिंदेंच्या बंडखोर गटाशी जोडण्यापर्यंत.
 
त्यानंतर ते जिल्हा परिषद निवडणूक लढले. दोनवेळा रायगड जिल्हा परिषदेवर निवडून आले. पशु, अर्थ, बांधकाम अशा विविध खात्यांचे दोनवेळा त्यांनी सभापतीपदही भूषवलं.
 
शिवसेनेचा आक्रमक नेता म्हणून रायगडमध्ये भरत गोगावलेंनी ओळख निर्माण करण्यास सुरुवात केली. रायगडमध्ये पूर्वी माजी मुख्यमंत्री बॅरिस्टर अंतुले तर नंतर राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरेंचा दबदबा होता. शेतकरी कामगार पक्षाचा सुद्धा एक गड रायगड जिल्ह्यात आहे. असं असतानाही भरत गोगावलेंनी जिल्ह्यात शिवसेनेची ताकद वाढवली आणि महाडमध्ये आपले पाय रोवले.
 
महाडचे सलग तीनदा आमदार
खरंतर महाड विधानसभा मतदारसंघ 1990 पासूनच शिवसेनेकडे होता. 1990, 1995 आणि 1999 अशा सलग तीनवेळा प्रभाकर मोरे हे शिवसेनेचे आमदार महाडचं प्रतिनिधित्व करत असत. मात्र, नंतर 2004 साली काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे माणिक जगताप यांनी हा मतदारसंघ शिवसेनेच्या हातून हिसकावून घेतला.
 
मात्र, काँग्रेस-राष्ट्रवादीला एकच कार्यकाळ या मतदारसंघात प्रतिनिधित्व करता आलं. कारण 2009 साली महाड मतदारसंघातून शिवसेनेनं भरत गोगावलेंनी तिकीट दिलं आणि ते जिंकलेही.
 
2009 नंतर 2014 आणि 2019 अशा सलग तीन वेळा भरत गोगावले महाड मतदारसंघात शिवसेनेचं आमदार म्हणून प्रतिनिधित्त्व करत आहेत.
 
2019 साली अलिबागमधून महेंद्र दळवी आणि कर्जतमधून महेंद्र थोरवे हे विजयी होईपर्यंत आधीचे दोन कार्यकाळ भरत गोगावले हे रायगडमध्ये शिवसेनेचे एकमेव आमदार होते. त्यामुळे रायगड जिल्ह्यातील शिवसेनेच्या संघटनेत त्यांना महत्त्वाचं स्थान होतं.
 
महाड मतदारसंघ हा पोलादपूर आणि महाड अशा दोन तालुक्यांनी प्रामुख्यांनी बनलाय. महाड आणि पोलादपूर अशी दोन निमशहरं वगळल्यास मतदारसंघात 90 ते 95 टक्के भाग ग्रामीण क्षेत्रातला आहे. त्यामुळे मतदारसंघाची भौगोलिक रचनाही विस्तृत आहे.
 
महाड-पोलादपूरमध्ये महाराष्ट्र औद्योगिक क्षेत्रही (MIDC) आहे. तीही रासायनिक विभागातील (Chemical Zone) आहे. त्यामुळे शेतीसह उद्योगाच्या दृष्टीनं सुद्धा महत्त्वाचा मतदारसंघ आहे.
 
तटकरेंशी संघर्ष
भरत गोगावलेंचे मतदारसंघातले विरोधक हे काँग्रेसचे नेते माणिकराव जगताप होते. गेल्यावर्षी माणिकराव जगतापांचं निधन झालं. त्यानंतर गोगावलेंचा मतदारसंघात मोठा विरोधक उरला नसल्याचं राजकीय विश्लेषक सांगतात.
 
मात्र, खासदार सुनील तटकरे आणि पालकमंत्री आदिती तटकरेंशी त्यांचा संघर्ष सुरू झाला आहे.
 
रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यात फेब्रुवारी 2022 मध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत पालकमंत्री आदिती तटकरेंवर नाराजी व्यक्त केली. आदिती तटकरे या राष्ट्रवादीच्या श्रीवर्धन मतादरसंघातील आमदार आणि रायगडच्या पालकमंत्री, तसंच राज्यमंत्री आहेत.
 
आदिती तटकरेंना पालकमंत्रिपदावरून हटवून शिवसेनेचा पालकमंत्री रायगडला द्यावा, अशी मागणीच त्यांनी केली होती. त्यांच्या या मागणीला रायगडमधील शिवसेनेचे इतर दोन आमदार महेंद्र थोरवे आणि महेंद्र दळवी यांचाही पाठिंबा असल्याचा दावा त्यांनी केला होता. आता गोगावलेंसह दळवी आणि थोरवे हे तिघेही एकनाथ शिंदेंच्या बंडखोर गटात सामिल झालेत.
 
घटक पक्ष म्हणून आदिती तटकरे शिवसेनेला विश्वासात घेत नाहीत आणि त्या मनमानी कारभार करतात, असा आरोपही गोगावलेंनी केला होता.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

साडी नेसल्याने कॅन्सर होऊ शकतो का? ही सुरुवातीची लक्षणे असू शकतात

Amla Navami 2024: आवळा नवमीला पूजा विधी

वामनस्तोत्रम्

नारायणस्तोत्रम् आणि नारायणाथर्वशीर्षोपनिषत्

Tulsi vivah 2024: शालिग्रामचा विवाह तुळशीशी का करतात?

सर्व पहा

नवीन

महायुतीला सत्तेत राहण्याचा अधिकार नाही,बेरोजगारीवर शरद पवारांची टीका

नितीन गडकरींचा मोठा आरोप, 'काँग्रेसने ग्रामीण भारताला प्राधान्य दिले

तरुणाने भाजप उमेदवाराला आश्वासनांबद्दल प्रश्न केला,रॅलीच्या ठिकाणाहून ढकलून बाहेर काढले

बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर पुण्यातील एक नेता बिश्नोई टोळीच्या निशाण्यावर असल्याचा मुंबई पोलिसांचा दावा

माजी खासदार सुभाष वानखेडे यांची शिवसेना युबीटीतून हकालपट्टी

पुढील लेख
Show comments