त्यामुळे हे फेक ट्विटर अकाऊंट आणि ती व्यक्ती नक्की कोण आहे, यावरून आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. ते वादग्रस्त ट्विट सीएम बोम्मईंच्या अकाऊंटवर का करण्यात आले आणि त्यावर कारवाई का झाली नाही असे प्रश्न विरोधकांकडून विचारले जात आहेत. याच दरम्यान, ट्विटर अकाऊंट हॅक झाले आहे हे सांगायला बोम्नईंना दिल्लीतल्या बैठकीची वाट का पाहावी लागली, असा रोखठोक सवाल माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केला.
दिल्लीत जी बैठक झाली त्यात दोन्ही राज्याचे मुख्यमंत्री, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि देशाचे गृहमंत्री होते. त्यानंतर एका वादग्रस्त ट्विटबद्दल कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई यांनी सांगितलं की त्यांच्या ट्विटरवरून ते ट्विट झाले असले तरी ते ट्विटर अकाऊंट हॅक झाले होते. गेले १५-२० दिवसांपासून सीमावादाचा प्रश्न चिघळला आहे. मुख्यमंत्र्यांचे ट्विटर अकाऊंट हॅक होतं का, याचा शोध आणि तपास नक्कीच केला जाईल. मग खुलासा करायला एवढा वेळ का लागला? दिल्लीत बैठक बोलावून त्यात चर्चा होण्याची वाट पाहण्यापर्यंत वेळ का लावला गेला?" असा सवाल उद्धव ठाकरेंनी थेट बोम्मईंना केला.
इतरही काही गोष्टी लक्षात आणून देत त्यांनी कर्नाटक सरकार आणि बसवराज बोम्मई यांच्यावर टीकास्त्र सोडले. "सीमेवर झालेल्या घटना, बसवरील हल्ले, निषेध नोंदवणे, काहींना झालेली अटक या सगळ्या गोष्टी हॅक किंवा फेक नव्हत्या. त्या साऱ्या खऱ्याखुऱ्या घडल्या होत्या. ट्विटरवर झालेल्या गोष्टींबाबतचे खुलासे मुख्यमंत्री कार्यालयाकडून व्हायला हवे होते. तितकं कार्यालय सजग असायला हवे. पण ज्या गोष्टी प्रत्यक्षात घडल्या त्याबद्दल काय स्पष्टीकरण दिलं जाणार आहे? मुख्यमंत्र्यांच्या ट्विटरवरून कोण काय ट्विट करतंय या खुलासा दिल्लीमध्ये बैठक बोलवण्यापर्यंत का थांबला होता? न्यायालयात प्रश्न असताना दोन्ही राज्यांनी गप्प बसावे हे तर साऱ्यांनाच माहिती आहे. मग अशा वेळी या बैठकीत नवीन काय झालं?" असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी अमित शाहांनाही सुनावले.
Edited By-Ratnadeep Ranshoor