Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
मंगलवार, 15 अक्टूबर 2024
webdunia

शिवसेनेचे खासदार द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देणार?

uddhav thackeray
, मंगळवार, 12 जुलै 2022 (11:44 IST)
आमदारांपाठोपाठ शिवसेनेतील खासदारही शिंदे गटात जाणार असल्याची चर्चा सध्या सुरू आहे. या पार्श्वभूमीवर सोमवारी उद्धव ठाकरे यांनी शिवसेना खासदारांची बैठक बोलावली होती.
 
दरम्यान उद्धव ठाकरे यांनी बोलावलेल्या खासदारांच्या बैठकीला भावना गवळी आणि श्रीकांत शिंदे हे केवळ दोनच खासदार उपस्थित नव्हते. बाकी सर्व खासदार उपस्थित होते, असा दावा शिवसेनेचे खासदार गजानन कीर्तीकर म्हणाले.
 
आम्ही सर्व खासदारांनी द्रौपदी मूर्मू यांना पाठिंबा देण्याची मागणी केली आहे असं ते म्हणाले. यासंदर्भात उद्धव ठाकरे दोन दिवसात निर्णय घेतील असंही त्यांनी सांगितलं.
 
पण, सर्व खासदारांनी त्याबाबतचा निर्णय घेण्याचे अधिकार उद्धव ठाकरेंना दिल्याचं उस्मानाबादचे शिवसेना खासदार ओमराजे निंबाळकर यांनी सांगितलं आहे. तसंच उद्धव ठाकरे जो निर्णय घेतली तो सर्वांना मान्य असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.
 
मुंबईत मंगळवारी सकाळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत संजय राऊत यांनीसुद्धा मुर्मूंना पाठिंबा देण्याचे संकेत दर्शवले आहेत.
 
आज उद्धव ठाकरे यासंदर्भातला त्यांचा निर्णय जाहीर करण्याची शक्यता आहे.
 
बैठकीला आलेले खासदार
गजानन किर्तीकर
विनायक राऊत
अरविंद सावंत
राहुल शेवाळे
धैर्यशील माने
हेमंत गोडसे
श्रीरंग बारणे
प्रतापराव जाधव
सदाशिव लोखंडे
ओमराजे निंबाळकर
उशीरा पोहोचलेले खासदार
 
हेमंत पाटील
बैठकीला अनुपस्थित खासदार
भावना गवळी
श्रीकांत शिंदे
कलाबेन डेलकर
राजन विचारे
राजेंद्र गावित
कृपान तुमाने
 
संजय मंडलीक हे कामानिमित्त दिल्लीत होते. त्यांची त्यांनी पूर्व कल्पना मातोश्रीला दिल्याची माहिती ओमराजे निंबाळकर यांनी दिलीय.
 
शिवाय संजय जाधव हे दिंडीमध्ये असल्यामुळे ते येऊ शकले नसल्याची माहितीसुद्धा निंबाळकर यांनी दिली आहे.
 
तर राज्यसभेचे संजय राऊत आणि प्रियांका चतुर्वेदीदेखील बैठकीला पोहोचले आहेत. तर अनिल देसाई मात्र दिल्लीत आहेत.
 
"देशात पहिल्यांदाच अनुसूचित जमातीतील एक महिला देशाच्या सर्वोच्च पदापर्यंत पोहोचत आहे. अशावेळी शिवसेनेनं द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा दिला तर महाराष्ट्रात सर्वच स्तरावर त्यांचं स्वागत होईल," अशी प्रतिक्रिया भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी एबीपी माझाशी बोलताना व्यक्त केली आहे.
 
शिवसेनेतील 40 हून अधिक आमदारांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली बंड केल्यानंतर राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सरकार स्थापन झालं. त्यानंतर शिवसेनेचे खासदारही आमच्या संपर्कात असल्याचे विधान शिंदे गटातील नेते गुलाबराव पाटील यांनी केले होते.
 
खासदार भावना गवळी यांनी भाजपबरोबर जाण्याबाबत शिंदे गटाच्या मागणीचा विचार करण्याबाबत मत व्यक्त केलं होतं.
 
राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत शिवसेनेने भाजपच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा द्यावा, अशी विनंती करणारं पत्र खासदार राहुल शेवाळे यांनी लिहिलं होतं.
 
त्यानंतर शिवसेना खासदारांची मतं राष्ट्रपती निवडणुकीत फुटणार अशी चर्चा सुरू झाल्याने पक्षाने लोकसभेतील मुख्य प्रतोदपदावरून खासदार भावना गवळी यांची उचलबांगडी करत खासदार राजन विचारे यांची नियुक्ती केली.
 
तरीही काही खासदारांनी उद्धव ठाकरे यांच्याशी व्यक्तिगत संपर्क साधून भाजपसोबत जाण्याचा विचार करण्याची विनंती केली. आपण काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या विरोधात निवडून आल्याने त्यांच्यासोबत राहण्यापेक्षा भाजपसोबत जाणं योग्य ठरेल, असा काही खासदारांचा युक्तिवाद आहे.
 
'आईच्या दूधाशी बेईमानी करू नका'; उद्धव ठाकरेंचं आमदारांना भावनिक पत्र
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांच्यावर निष्ठा दाखवत संकटाच्या काळात साथ दिल्याबद्दल शिवसेनेच्या 15 आमदारांना धन्यवाद व्यक्त करणारे भावनिक पत्र पाठवले आहे.
 
सुप्रीम कोर्टाचा निर्णय येण्याआधीच शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या सोबत राहीलेल्या 15 निष्ठावान शिवसेना आमदारांना भावनिक पत्र लिहिलं आहे. या पत्रात शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी अडचणीच्या आणि संकटाच्या काळात साथ दिल्याबद्दल त्यांचे धन्यवाद मानले आहेत.
 
उद्धव ठाकरे यांनी या पत्रात म्हटलं, "आईच्या दूधाशी बेईमानी करू नका हा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा मंत्र जपत तुम्ही शिवसेनेसोबत राहत निष्ठेचं पालन केलं आहे. कोणत्याही धमक्या आणि प्रलोभनांना बळी न पडता आपण एकनिष्ठ राहिलात आणि शिवसेनेला बळ दिलेत. आई जगदंबा तुम्हास निरोगी आयुष्य देओ हीच प्राथना."

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

अनेक शाळांना पावसाची सुटी