Amravati News अमरावती जिल्ह्यातील मेळघाटातील धारणी या आदिवासीबहुल तालुक्यांमध्ये उपजिल्हा रुग्णालयातून एक आश्चर्यकारक बातमी समोर आली आहे. येथे एका गरोदर आईने चार मुलींना जन्म दिला आहे. त्यामुळे संपूर्ण मेळघाटात याची चर्चा सुरु आहे.
धारणी तालुक्यातील दूनी गावातील पपीता उईके या तिसऱ्या प्रसुतीकरता बुधवारी सकाळी 10 वाजेच्या सुमारास धारणी उपजिल्हा रुग्णालयात दाखल झाल्या होत्या. येथील स्त्रीरोग तज्ज्ञांनी पपीताची सामान्य प्रसृती यशस्वीरित्या पार पाडली. या प्रसुती दरम्यान पपीताने चार मुलींना जन्म दिल्याने सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.
धारणी उपजिल्हा रुग्णालयातील ही पहिलीच घटना असल्याचे सांगितले जात आहे. जन्माला आलेले चारही मुली सुखरुप आहेत. मुलींचे सरासरी वजन 1 किलो 200 ग्रॅम आहे. जन्म झालेल्या मुलींचे वजन कमी असल्यामुळे त्यांना रुग्णालयातील एस एन सी यू मध्ये ठेवण्यात आले आहे. तरी आई व मुली सर्वांची परिस्थिती सामान्य असल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली आहे.
अशी ही पहिली घटना असल्यामुळे याकडे कुतूहलाने पाहिले जात असून गावात एकाच वेळी चार मुलींचा जन्म झाल्याने आनंदी वातावरण आहे.