फोटो साभार- सोशल मीडिया कौटुंबिक हिंसाचारासह लैंगिक शोषण, बालविवाह, हुंडाबळी, छळ, जाच, ॲसिड हल्ले, सायबर क्राइम आणि बाल लैंगिक शोषणग्रस्त पीडितांनी नंदुरबार येथे सखी वन स्टॉप सेंटरमध्ये संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा महिला व बालविकास अधिकारी साईनाथ वंगारी यांनी प्रसिद्धीस दिलेल्या शासकीय पत्रकान्वये केले आहे.
केंद्र सरकार पुरस्कृत सखी वन स्टॉप सेंटर संकटग्रस्त, पीडित महिलांना आधार देण्यासाठी व त्यांच्या पुनर्वसनासाठी जिल्हा शासकीय रुग्णालय, आवारात प्रशिक्षण इमारत, पहिला मजला, नंदुरबार येथे सुरू करण्यात आले आहे. या कार्यालयाच्या माध्यमातून महिलांना 24 तास मदत केली जाते.
सखी वन स्टॉप क्रायसेस सेंटरच्या मार्फत महिलांना पुढील सात प्रकारच्या तातडीच्या सेवा उपलब्ध करुन दिल्या जातात. आपत्कालीन/ बचाव सेवाअंतर्गत आरोग्य अभियान 108 सेवा, पोलीस मदत जेणे करुन हिंसाचाराने बाधित महिलेला वेळेवर जवळील आरोग्य, कायदेविषयक ठिकाणी पाठवुन योग्य त्या सेवा दिल्या जातात.
वैद्यकीय मदतअंतर्गत हिंसाचाराने पीडित महिलेची आरोग्य तपासणी होऊन तिला वेळेवेर औषधोपचार करण्यात येते. पोलीस मदत सेवा अंतर्गत हिंसाचाराने पीडित महिलेला एफआयआर, एनसीआर, व डीआयआर दाखल करण्यासाठी मदत केली जाते. मानसिक सामाजिक समर्थन/ समुपदेशन अंतर्गत हिंसाचाराने पीडित महिलेला प्रत्यक्ष अथवा दूरध्वनीद्वारे समुपदेशनाची सेवा देण्यात येते. कायदेशिर मदत आणि समुपदेशन अंतर्गत पीडित महिलांना न्याय मिळण्याची सोय करणे, कायदेशीर मदत आणि समुपदेशन, विधी सेवा प्राधिकरणामार्फत पीडीत महिलेला मोफत विधी सेवा मिळवून संबंधित महिलेला न्याय मिळविण्यासाठी पाठपुरावा केला जातो.
तात्पुरता निवारातंर्गत पीडित महिलांना पाच दिवसासाठी तात्पुरता निवाराची व्यवस्था करण्यात येते. व्हीडीओ समुपदेशन सुविधा अंतर्गत व्हीडीओ समुपदेशन, पोलिसांची मदत, सायको- सोशल कोर्ट आदी सुविधा पुरविण्यात येतात.
संकटग्रस्त महिलांनी प्रत्यक्ष, समाज कार्यकर्त्या किंवा पोलीसामार्फत सखी वन स्टॉप क्रायसेस सेंटरशी संपर्क साधू शकता. यासाठी 9420042466 या क्रमांकावर 24 तास सेवा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. त्याच प्रमाणे चाईल्ड हेल्पलाईन 1098, घरगूती हिंसाचारासाठी 181 , संकटात त्वरीत मदतीसाठी 1090 या हेल्पलाईन वर संपर्क करु शकतात.
सखी वन स्टॉप सेंटरचा पत्ता असा : सखी वन स्टॉप क्रायसेस सेंटर, जिल्हा शासकीय रुग्णालय आवारात प्रशिक्षण इमारत,नंदुरबार येथील पहिला मजला येथे संपर्क साधावा.