Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

सचिन तेंडुलकर: अमिताभ बच्चन यांना जेव्हा मास्टर ब्लास्टरच्या शेजारी बसायचं होतं...

Webdunia
सोमवार, 24 एप्रिल 2023 (09:34 IST)
सचिन तेंडुलकरनं वयाचं अर्धशतक पूर्ण केलं आहे. तब्बल साडेतीन दशकांहून अधिक काळ तो क्रिकेटशी जोडला गेला आहे. काही मोजक्या लोकांना सचिनच्या या प्रवासाचं अगदी जवळून साक्षीदार होता आलं.
क्रिकेट समीक्षक आणि लेखक द्वारकानाथ संझगिरी हे त्यापैकीच एक आहेत. मास्टर ब्लास्टर सचिनच्या क्रिकेट पिचवरच्या कारकीर्दीविषयी संझगिरींनी अनेकदा भरभरून लिहिलं आहे.
 
पण खेळाबाहेरचा सचिन कसा आहे, याविषयी त्यांनी आपल्या ‘शतकात एकच...सचिन’ या आगामी पुस्तकात लिहलं आहे. ‘ग्रंथाली’ प्रकाशित करणार असलेल्या या पुस्तकात सचिनच्या लोकप्रियतेची झलक दाखवणारे काही किस्से संझगिरींनी सांगितले आहेत. त्याचाच हा संकलित भाग.
 
लोकप्रियतेच्या शिखरावरचा सचिन
भारतीय क्रिकेटमध्ये अनेक लोकप्रिय क्रिकेटपटू होऊन गेले. माझ्या वडिलांच्या पिढीत सी. के. नायडू आणि मुश्ताक अली हे अत्यंत लोकप्रिय होते.
 
पण सचिन तेंडुलकरच्या लोकप्रियतेने सर्वच मर्यादा पार केल्या. सचिननंतर धोनी लोकप्रिय झाला, आज विराट कोहली, रोहित शर्मा यांचीसुद्धा लोकप्रियता प्रचंड आहे.
 
पण मी माझ्या आयुष्यात सचिन एवढी लोकप्रियता कोणाचीही पाहिली नाही. त्याची लोकप्रियता म्हणजे ओहोटी नसलेला समुद्र. तिला कायमच भरती असते. अगदी निवृत्त झाल्यावर सुद्धा.
 
मध्यंतरी त्याने एक इन्स्टाग्रामवर फोटो टाकला होता. तो विमानातून कुठेतरी चालला होता आणि विमानात तो बसला आणि संपूर्ण विमानातल्या लोकांनी ‘सचिन सचिन’ असं बोलायला सुरुवात केली.
 
सचिनने तेव्हा उठून त्यांना अभिवादन केलं नाही, पण त्यांने नंतर इन्स्टाग्रामवर ती क्लिप टाकली आणि त्या सर्वांचे आभार मानले आणि त्यात त्याने लिहिलं, ‘सीटबेल्ट ची साईन ऑन असल्यामुळे मी उठून उभे राहून त्यांना अभिवादन करू शकलो नाही.’ थोडक्यात त्याने एअरलाइन्सचा नियम पाळला आणि म्हणून त्याने इंस्टाग्राम वरून त्यांचे आभार मानले.
 
2010 साली सचिन एका 87 वर्षे वयाच्या सरस्वती वैद्यनाथन नावाच्या महिलेला भेटला. तिला सचिन आपला नातू वाटायचा.
 
वय झालं तरी त्या सरस्वतीची स्मरणशक्ती अत्यंत तल्लख होती. तिला सचिन तेंडुलकरच्या सर्व धावा पाठ होत्या.
 
तिचा मुलगा असं म्हणतो, “तेंडुलकरला खेळताना पाहून ती आपले आजार विसरायची. किंबहुना तिच्या प्रकृतीमध्ये सुधारणा व्हायची. सचिनने शंभर शतक ठोकावीत असं तिला वाटायचं.” दुर्दैवाने जेव्हा त्याने शंभर शतकं ठोकली त्यावेळी ती या जगात नव्हती.
 
अमिताभला जेव्हा सचिनच्या शेजारी बसायचं होतं..
सचिनचे विविध क्षेत्रातल्या सेलिब्रिटीज फॅन्स तर अनेक आहेत.
 
एकदा विमानतळावर सचिन चालत होता. मागून धीर गंभीर आवाजात सचिनला हाक ऐकू आली, “अहो सचिन तेंडुलकर मी भीमसेन जोशी. मी आपला फॅन आहे,” लगेच सचिन मागे वळला आणि भीमसेन जोशींना भेटायला गेला.
 
मी एक कार्यक्रम सुनील गावस्कर आणि गुंडप्पा विश्वनाथ यांच्या ‘साठी’निमित्त आयोजित केला होता. त्यात सुनील गावस्कर आणि विश्वनाथ यांचा सत्कार अमिताभ बच्चन करणार होता आणि पाहुणा म्हणून सचिन तेंडुलकरला बोलावलं होतं.
 
अमिताभनी आमंत्रण स्वीकारलं म्हणून आम्ही अमिताभना भेटायला मेहबूब स्टुडिओत गेलो. तेव्हा त्यांनी मला असं विचारलं, की “कार्यक्रम नेमका किती वाजता आहे?” मी त्यांना म्हटलं, की “कार्यक्रम साधारण चार ते सात असा आयोजित केला आहे.”
 
त्यांनी अत्यंत अदबीने मला विचारलं, “मी तीन वाजता कार्यक्रमाला आलो तर चालेल.” मी मनात म्हटलं, ‘तुम्ही आदल्या दिवशी आलात तरी चालेल.’ अमिताभ जर लवकर येत असेल तर कोण नाही म्हणेल?
 
पण त्यांनी मला तिथे सांगितलं, की “मला लवकर यायचं याचं कारण म्हणजे या सगळ्या क्रिकेटपटूंना समारंभात मी अधूनमधून भेटत असतो. पण त्यांचे आई-वडील, त्यांची भावंडं यांना मला भेटता येत नाही. मला सुनीलचे आई-वडील, सचिनची आई, भाऊ यांना मला भेटायचं आहे. त्यामुळे मी असा विचार करतोय, की लवकर यावं आणि त्यांना भेटावं.”
 
सचिनची आई कार्यक्रमाला येऊ शकली नाही पण सचिनचा मोठा भाऊ नितीन यांना अमिताभ अत्यंत प्रेमाने भेटला, विचारपूस केली आणि सगळ्यात गंमत म्हणजे त्या कार्यक्रमाच्या आधी काही दिवस अमिताभकडून आम्हाला एक फोन आला आणि फोनवर त्याने एक छोटीशी विनंती केली.
 
काय विनंती असेल? त्यांच्या पीएने विचारलं, “अमिताभ सरांना सचिनच्या बाजूला बसता येईल का?”
 
हे मी सचिनला सांगितल्यावर सचिनला काय वाटलं हे मला सांगता येणार नाही पण मी मात्र नखशिखांत थरारलो.
 
‘हॅरी पॉटर’लाही सचिनचं वेड
‘हॅरी पॉटर’चा हिरो ‘डॅनियल रॅडक्लिफ’ हा क्रिकेट आणि सचिन तेंडुलकरचा फॅन आहे.
 
इंग्लंडसाठी क्रिकेट खेळणं हे त्याचं एकेकाळी स्वप्न होतं. पण ते त्याचं स्वप्न पूर्ण झालं नाही. तो अभिनयाकडे वळला. ‘हॅरी पॉटर’मधली त्याची भूमिका त्याने प्रचंड गाजवली.
 
2007 साली लॉर्ड्सवर इंग्लंड विरुद्ध भारत हा कसोटी सामना होता. शेवटच्या दिवशी मॅच ड्रॉ झाली, त्यावेळेला रॅडक्लिफ आपल्या मित्रांबरोबर तिथे होता. खेळ संपल्यानंतर तो इंग्लंडच्या संघाला भेटला आणि मग त्यानंतर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला.
 
त्याने ‘लंडन टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत असं म्हटलं होतं, “माझे मित्र आणि मी आम्ही सचिनला भेटलो आणि अंगावर रोमांच उठले. आम्हाला त्याची स्वाक्षरी घेता आली. मी त्याचा प्रचंड फॅन आहे. तो खरोखरच लिजंड आहे.”
 
अशी कितीतरी सेलिब्रिटीजची उदाहरणं मी तुम्हाला सांगू शकतो. जगभरातले क्रिकेटपटू त्याला पाहण्यासाठी जीव टाकत, झाडून सर्व नवेजुने वगैरे.
 
जमिनीशी नाळ जपणारा क्रिकेटर
सचिनला मी त्याच्या वयाच्या चौदाव्या वर्षापासून ओळखतो. आता त्याने वयाचे अर्ध शतक पूर्ण केलं. ह्या छत्तीस वर्षात तो बघताबघता आकाशाएवढा उंच झाला. पण त्याचे पाय कधीही जमीनीवरून हलले नाहीत. जमीनीशी त्याचं नात कधी तुटलच नाही.
 
लोकप्रियतेच्या सर्वोच्च शिखरावर बसल्यावर जमीनीला इतकं घट्ट पकडून ठेवणं इतकं सोपं नसतं. मी अर्ध्या हळकुंडाने पिवळे झालेले अनेक क्रिकेटपटू पाहिले आहेत, पण सचिन कधी बदलला नाही.
 
किती उदाहरणे देऊ. 1999 ची गोष्ट आहे.
 
विश्वचषकाच्या आधी सचिन, त्याची बायको अंजली आणि त्यावेळेला लहान असणारी मुलगी सारा आमच्या घरी जेवायला आले होते.
सचिन बऱ्याचदा घरी आल्यामुळे आमच्या गल्लीतल्या मंडळींना ठाऊक होतं, की सचिन इथे येतो. प्रत्येकवेळी थोडीफार गर्दी व्हायची. मुलं सचिन बाहेर पडेपर्यंत वाट पाहायची आणि सचिन त्यांना सही देऊन खुश करून जायचा.
 
ह्यावेळी मात्र कुणीतरी बाहेर बातमी पसरवली, की सचिनबरोबर राहुल द्रविड आणि आणखी एक क्रिकेटपटू आला आहे.
 
बघताबघता गल्लीमध्ये दोन-तीनशे माणसे जमली. मी तळमजवल्यावरच राहतो. त्यामुळे खिडकीतून डोकावणारी माणसे मला दिसत होती. गर्दीला शिस्त नसते आणि भारतात तर ती मुळीच नसते. काही माणसे सचिनने बाहेर उभ्या केलेल्या त्याच्या मर्सिडिस गाडीवर उभी राहिली आणि ‘सचिन सचिन’ हाका मारायला लागली.
 
मी आमच्या घरासमोर राहणाऱ्या मित्राला पोलिसांना बोलवायला सांगितलं. एक पोलीस दांडू आपटत आपटत आला, आणि ‘कुठेय सचिन, कुठेय सचिन’ म्हणून घरात शिरला. माझं छोटं दोन खोल्यांचं घर. त्याने आधी सचिनला शेकहँड केला, त्याच्याशी चार शब्द बोलला आणि मग दांडा आपटत बाहेर जमाव पांगवायला गेला.
 
सचिन म्हणाला, “मी त्यांना बाहेर जाऊन स्वाक्षरी देऊ काय?” मी म्हंटलं, “अरे वेड्या, स्वाक्षरी द्यायला सुरुवात केलीस तर इथेच पहाट उजाडेल,” तरीसुद्धा पोलिसांच्या मदतीने त्याच्या गाडीकडे वाट काढेपर्यंत सचिनने 40-50 स्वाक्षऱ्या दिल्यासुद्धा.
लोकप्रियतेच्या स्तरावर सचिन हा लता मंगेशकर, अमिताभ बच्चन एवढाच लोकप्रिय आहे. इतर कुणीही अशा स्वाक्षऱ्या देण्याचा प्रयत्नसुद्धा केला नसता. पण सचिनने तो केला याचं भयंकर कौतुक वाटलं.
 
सचिन मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर सराव करायला जायचा. तिथे बऱ्याच वेळा श्रीमंतांची लग्न असतात.ते सचिनबरोबर फोटो काढण्यासाठी धडपडत सचिन त्यांना शांतपणे फोटो देई. एकदा असाच एक श्रीमंतांचा ग्रुप सचिनबरोबर फोटोसाठी उभा राहिला.
 
तिथे एक अंगात फाटलेला गंजीफ्रॉक घातलेला लहान मुलगा फोटोसाठी धडपडत होता. सचिनबरोबर फोटो काढणारा जो ग्रुप होता त्या ग्रुप मधली मंडळी त्याला बाहेर हाकलून द्यायचा प्रयत्न करीत होती.
 
सचिनने हे सर्व पाहिलं. त्यावेळेला तो काहीच बोलला नाही. नंतर त्याने त्या मुलाला मैदानाकडे जाताना पाहिलं.
मैदानात एक कामगार घण घेऊन दगड फोडत होता. सचिनला लक्षात आलं, की तो मुलगा त्या कामगाराचा मुलगा आहे. त्याने त्या कामगाराकडे एक छोटा मोबाईलसुद्धा पाहिला आणि सचिन प्रॅक्टिसला निघून गेला.
 
प्रॅक्टिस संपल्यानंतर तो त्या घणाने दगड फोडणाऱ्या कामगाराकडे गेला. बाजूलाच तो मुलगा खेळत होता. सचिननं मुलाला जवळ बोलावलं. त्याच्या हातातला मोबाईल पाहिला. त्याच्यावर फोटो येतात की नाही हे पाहिलं आणि त्याने मुलाच्या वडिलांना सांगितलं, हवे तेवढे फोटो घ्या. आणि त्याने ते फोटो काढले. त्या कामगाराच्या मुलाला देव भेटल्याचा साक्षात्कार झाला असेल.
 
आजही चाहत्यांचा लाडका सचिन
अगदी परवाचीच गोष्ट सांगतो, मी आजारी हे त्याला कळलं. त्याने मला फोन केला आणि सांगितलं, “मी, अजित आणि नितीन तुला भेटायला येतोय, सध्या तू कुठे आहेस,” मी त्याला माझ्या मुलाकडे, सनिलकडे विक्रोळीला बोलवलं. तो तिथे प्रथमच येत होता.
 
सचिन येणार आहे हे आम्ही त्या प्रचंड मोठ्या कॅम्पसमध्ये कोणालाही सांगितलं नाही. सचिन गाडीतून उतरला आणि सनिल त्याला घ्यायला आमच्या इमारतीच्या खाली गेला.
 
सचिन आत आला, त्याला फक्त गुरख्याने ओळखलं असावं. बाकी तिथे कोणीही नव्हतं. त्या सोसायटीमध्ये काम करणारी एक मोलकरीण फक्त तिथे होती. तिने सचिनला पाहिलं, तिच्या लक्षात आलं, की आपण या माणसाला कुठेतरी पाहिलं आहे.
 
तिने त्या गुरख्याला विचारलं, “हा कोण आहे?” आणि ते विचारलेलं सचिनच्या कानावरही गेलं. तो गुरखा कुजबुजला, “सचिन तेंडुलकर आहे.” ती मोलकरीण सचिनकडे गेली आणि सचिनला म्हणाली, “सॉरी हं, मी तुम्हाला ओळखलं नाही. तुम्ही चष्मा लावला ना म्हणून ओळखलं नाही,” मुंबईत सचिनला न ओळखण्याचा तो पहिला प्रसंग असावा.
 
सचिन घरी आला, दोन-अडीच तास मस्त गप्पा झाल्या. सचिनने घरातल्या प्रत्येक मोलकरणीला फोटो काढू दिला. आमची आसामी मोलकरीण इतकी स्मार्ट तिने एका दिवसात फोटो प्रिंट करून घरी फ्रेम लावली.
 
खाली काय झालं याची आम्हाला कल्पना नव्हती. सहाशे फ्लॅट असलेल्या या कँपसमध्ये सचिन आलाय ही बातमी वाऱ्यासारखी पसरली. सचिनला सोडायला मी जेव्हा खाली गेलो आणि पाहिलं तर समोर चार-पाचशे लोक उभी होती. प्रत्येकाच्या हातात मोबाईल आणि स्वाक्षरीची वही. प्रत्येकाला त्याची स्वाक्षरी हवी होती आणि सेल्फी.
 
सुदैवाने आमच्या लक्षात आलं, की सचिनच्याच कंपनीत काम करणारा एक मुलगा आमच्याच इमारतीत राहतो. सचिनने त्याला सांगितलं, की ही गर्दी जरा नीट अॅरेंज कर तोपर्यंत मी परत वरती जातो. आणि आम्ही पुन्हा आमच्या अकराव्या मजल्यावर परत आलो.
 
सचिनला म्हटलं, “केवढा नशीबवान आहेस, आज निवृत्त होऊन तुला दहा वर्ष झाली तरी तुझ्या लोकप्रियतेमध्ये अणुभरही फरक पडलेला नाही. मला आठवतेय, 2019ला वर्ल्डकपच्यावेळी तू नुसता मैदानात दिसलास, की लोक ‘सचिन सचिन’ म्हणून साद घालायचे. तुझी ही लोकप्रियता अशीच तहहयात राहणार आहे,” आणि ती राहिल कारण सचिनने कोणाला कधी आव्हेरलं नाही.
 
त्या दिवशीसुद्धा मी त्याला म्हटलं, “तुझी गाडी आपण बेसमेंटला बोलावूया आणि मी लिफ्ट थेट बेसमेंटला नेतो. तिथून तू आरामात सटकू शकतोस." पण तो ‘नाही’ म्हणाला.
 
तो म्हणाला, “मी या लोकांना टाळून, दुखवून जाणार नाही.”
 
मला एक गोष्ट जाणवली, की सचिनच्या लोकप्रियतेचा सुगंध हा कायम दरवळणारा सुगंध आहे. त्याला काळाची मर्यादा नाही, कारण क्रिकेटमध्ये ध्रुवपद मिळवूनही त्याने जमिनीशी नातं तोडलं नाही. तो हवेत कधीच तरंगला नाही.
 
Published By - Priya Dixit 
 
 
 
 
 
 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

साडी नेसल्याने कॅन्सर होऊ शकतो का? ही सुरुवातीची लक्षणे असू शकतात

Amla Navami 2024: आवळा नवमीला पूजा विधी

वामनस्तोत्रम्

नारायणस्तोत्रम् आणि नारायणाथर्वशीर्षोपनिषत्

Tulsi vivah 2024: शालिग्रामचा विवाह तुळशीशी का करतात?

सर्व पहा

नवीन

IND vs SA: संजू सॅमसन T20 मध्ये सर्वात जलद सात हजार धावा पूर्ण करणारा सहावा भारतीय ठरला

भारताने दक्षिण आफ्रिकेवर 61 धावांनी विजय मिळवला

हारिस रऊफने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास

Champions Trophy 2025 : टीम इंडिया पाकिस्तानला जाणार नाही

IND vs SA: पहिल्या T20 मध्ये नजरा अभिषेक-संजूवर, संभाव्य प्लेइंग11 जाणून घ्या

पुढील लेख
Show comments